सोमवारी जवळजवळ ४० दिवसांनंतर दैनंदिन करोना रुग्णसंख्या दोन लाखांच्या खाली आल्यानंतर मंगळवारी या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात करोनाचे २ लाख ८ हजार ९२१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर २ लाख ९५ हजार ९५५ करोना रुग्ण मंगळवारी करोनामधून बरे झाले आहेत. सध्या उपचार घेत असणाऱ्या रुग्णांची संख्या २५ लाखांच्याही खाली आली आहे. मात्र त्याच वेळेस करोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण पुन्हा वाढल्याचं दिसून आलं आहे. गेल्या २४ तासांमध्ये करोनामुळे ४ हजार १५७ जणांचा मृत्यू झालाय. आरोग्यमंत्रालयाने बुधवारी यासंदर्भातील आकडेवारी जारी केली आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात मागील २४ तासांत २ लाख ८ हजार ९२१ नवीन करोनबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर २ लाख ९५ हजार ९५५ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. गेल्या काही दिवसांपासून केंद्र आणि राज्य सरकारांच्या चिंतेत भर घालणाऱ्या मृतांच्या संख्येमध्ये कालच्या तुलनेत वाढ झालीय. गेल्या २४ तासांत देशात ४ हजार १५७ मृत्यूंची नोंद झाली आहे. देशातील एकूण मृतांची संख्या ३ लाख ११ हजार ३८८ वर पोहोचली आहे.

देशातील एकूण सक्रीय रुग्णांची संख्या २५ लाखांच्या खाली आली असून सध्या २४ लाख २९ हजार ५९१ रुग्ण करोनावर उपचार घेत आहेत. देशात करोना लसीकरण करण्यात आलेल्यांची संख्या २० कोटी ६ लाख ६२ हजार ४५६ इतकी असल्याचंही आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे.