करोनामुळे देशाला बसलेल्या आर्थिक फटक्याच्या पार्श्वभूमीवर आणखीन एक चिंतेत टाकणारी बातमी समोर आली आहे. सामर्थ्यशाली देशांच्या यादीमधून भारत बाहेर फेकला गेला आहे. भारत हा आशियामधील चौथा सर्वात शक्तीशाली देश ठरला आहे. सिडनीमधील लोवी इन्स्टिट्यूटने केलेल्या अभ्यासामध्ये आशियामधील सर्वात प्रभावशाली देशांची यादी जाहीर केली आहे. आशिया पॉवर इंडेक्स फॉर २०२० हा अहवाल सादर झाला असून आशिया पॅसिफिक प्रदेशामध्ये भारत हा अमेरिका, चीन आणि जपाननंतर चौथा सर्वात प्रभावशाली देश ठरला आहे. मात्र सर्वात सामर्थ्यशाली म्हणजेच मेजर पॉवर हा दर्जा भारताने गमावला आहे. ४० हून अधिक गुण असणाऱ्या देशांना प्रभावशाली देशांच्या यादीत स्थान दिलं जातं. मागील वर्षी भारताला ४१ गुण होते तर यंदा यामध्ये १.३ ची घट झाली असून भारताला  २०२० मध्ये ३९.७ गुण मिळाले आहेत.

आशिया पॅसिफिकमध्ये करोनामुळे सरासार परिस्थिती खालावत चाललेल्या १८ देशांमध्ये भारताचा समावेश आहे. करोनामुळे देशाच्या आरोग्य आणि आर्थिक परिस्थितीवर मोठा ताण पडला असून यामुळेच भारताचा विकास मंदावला आहे असं लोवी इन्स्टिट्यूटने आपल्या अहवालात म्हटलं आहे. चीनच्या तुलनेत भारत म्हणावा तसा विकास करत नसल्याचेही या अहवालात म्हटलं आहे. “लोकसंख्येच्या दृष्टीने चीनच्या बरोबरीने उभा राहणार भारत हा एकमेव देश असला तरी विकासाच्या बाबतीत तो पुढील काही वर्षांमध्ये चीनची बरोबर करु शकणार नाही. करोनाचा भारतावर मोठा परिणाम झाला असून या साथीमुळे दोन देशांमधील दरी अधिक वाढली आहे,” असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. २०३० पर्यंत भारत हा चीनच्या ४० टक्के विकास करु शकतो असं या अहवालात म्हटलं आहे. २०१० च्या आशिया पॉवर इंडेक्समध्ये हा विकासदर ५० टक्के असेल असं नमूद करण्यात आलं होतं. मात्र आता यामध्ये घट होणार असून तो ४० पर्यंत राहण्याचा अंदाज आहे.

सामर्थ्याच्या दृष्टीने भारत हा मध्यम स्तरामधील देश असल्याचा उल्लेख या अहवालात आहे. “आशियामधील सर्वाधिक लोकसंख्येच्या यादीत दुसऱ्या स्थानी असणारी हा देश चांगली कामगिरी करणारा इंडो पॅसिफिकमधील मध्यम स्तरावरील देश आहे,” असा उल्लेख या अहवालात आहे. पुढील काही वर्षांमध्ये भारताला प्रमुख शक्तीशाली देश म्हणून मान्यता मिळण्यासाठी वाट पहावी लागण्याची शक्यता आहे असंही यात म्हटलं आहे. २०३० पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था ही आधी व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा १३ टक्के कमी विकास करेल असंही अहवालात म्हटलं आहे.

जागतिक स्तरावर भारताचा प्रभाव कमी झाला असला तरी आशिया खंडातील भारताचा प्रभाव वाढत असल्याचे अहवालात म्हटलं आहे. भारताचे संरक्षण क्षेत्र आणि आर्थिक समिकरणे अधिक मजबूत होत असल्याचं यामध्ये म्हटलं आहे.

 

 

Story img Loader