नवी दिल्ली : देशातील करोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात वैद्यकीय प्राणवायूचा तुटवडा प्रकर्षाने जाणवत असून त्याला सरकारची अकार्यक्षमता आणि नियोजनाचा अभाव कारणीभूत असल्याचा आरोप काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांनी शनिवारी केला. कोविड-१९ मुळे जे मृत्यू झाले त्याबाबत सरकारला जनतेला उत्तर द्यावे लागेल, असेही त्या म्हणाल्या.

प्रियंका यांनी ‘जबाबदार कोण’ मोहीम हाती घेतली असून सरकारने कोविड-१९ स्थिती ज्या पद्धतीने हाताळली त्याबद्दल त्या सरकारला प्रश्न विचारत आहेत.  भारताने २०२० मध्ये प्राणवायूची निर्यात ७०० टक्क््यांनी वाढवली आणि देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेत प्राणवायूची मागणी वाढलेली असतानाही प्राणवायूची आयात करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.  तुटवड्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची अकार्यक्षमता आणि नियोजनाचा अभावच कारणीभूत आहे हे स्पष्ट आहे, असे त्या म्हणाल्या.