काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्ती यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री निधीतून निकटवर्तीयांना पैसा देण्यात आल्याच्या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने तपास सुरू केला आहे. मेहबूबा यांच्या सहकाऱ्याच्या श्रीनगरमधील निवासस्थानातून हस्तगत करण्यात आलेल्या दोन डायऱ्यांतील नोदींची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौकशी चालविली आहे.
दोन दिवसांपूर्वी केलेल्या चौकशीत ईडीने मुफ्ती यांना एका डायरीतील पानांच्या प्रती दाखवल्या. यात मुख्यमंत्र्यांच्या स्वेच्छाधीन निधीतून त्यांच्या नातेवाईकांसह अनेक व्यक्तींना, पक्षाच्या कार्यक्रमांसाठी आणि ‘वैयक्तिक’ खर्चापोटी दरमहा रकमा देण्यात आल्याच्या नोंदी आहेत. २३ बँक खात्यांची पडताळणी केल्यानंतर आणि अनेक महत्त्वाच्या व्यक्तींची चौकशी व त्यांच्याकडे घातलेल्या छाप्यानंतर ईडीने सरकारी निधीतून सुमारे ७ ते ८ कोटींचा निधी ‘वैयक्तिक आणि राजकीय कारणांसाठी’ वळवण्यात आल्याचे प्रकरण निश्चित केले आहे.
या नोंदींची पडताळणी केली असता, स्वत: मेहबूबा यांनी स्वत:साठी, तसेच बेघरांसाठी पैसा वळवल्याचे दिसून आले.