अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इव्हांका ट्रम्प यांच्या व्यक्तीगत सहाय्यकाला करोना व्हायरसची लागण झाली आहे. करोना पॉझिटिव्ह ठरलेली व्हाइट व्हाऊसमधील ही तिसरी व्यक्ती आहे. मागच्या अनेक आठवडयांपासून हा व्यक्तीगत सहाय्यक इव्हांका ट्रम्प यांना भेटलेला नाही असे वृत्त सीएनएन वाहिनीने दिले आहे.
इव्हांका आणि तिचे पती जेराड कुशनर यांची शुक्रवारी करोना व्हायरसची चाचणी करण्यात आली. त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. या घडामोडींशी संबंधित असलेल्या सूत्राने वाहिनीला ही माहिती दिली. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष माइक पेन्स यांच्या प्रेस सचिव कॅटी मिलर यांना सुद्धा करोनाची लागण झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: या वृत्ताला दुजोरा दिला.
आणखी वाचा- लसीशिवाय नाहीसा होईल करोना व्हायरस -डोनाल्ड ट्रम्प
मिलर माझ्या संपर्कात आली नाही पण पेन्स यांच्या संपर्कात ती होती असे ट्रम्प म्हणाले. ट्रम्प यांच्या सेवेतील एका व्यक्तीला गुरुवारी करोना व्हायरसची बाधा झाली. सेवेतील व्यक्तीला करोनाची लागण झाल्याने आपण आता नियमित करोनाची चाचणी करणार आहोत असे ट्रम्प यांनी जाहीर केले.
मिलर यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर व्हाइट हाऊसमध्ये त्या कोणा-कोणाच्या संपर्कात आल्या त्यांचा शोध घेण्यात आला असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. अमेरिकेत करोना व्हायरसमुळे अत्यंत भीषण परिस्थिती आहे. लाखो नागरिकांना करोनाची बाधा झाली असून आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे.