करोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, झारखंड मंत्रिमंडळाने बुधवारी झारखंड संसर्गजन्य रोग अध्यादेशाला मंजुरी दिली. यात, सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टी न घालणे, थुंकणे यांसारख्या कोविड-१९च्या प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन न करणाऱ्यांना १ लाख रुपयांपर्यंतचा दंड व २ वर्षांपर्यंतची कैद अशा शिक्षेची तरतूद आहे.
राज्य सरकारने जारी केलेल्या निवेदनानुसार, झारखंडमध्ये बुधवारी कोविड-१९ ची ४३९ नवी प्रकरणे आढळली आणि आणखी ३ लोकांचा या रोगामुळे मृत्यू ओढवला. राज्यात आतापर्यंत ६४ लोक करोनामुळे मृत्युमुखी पडले आहेत, तर करोनाबाधितांची संख्या ६६८२ पर्यंत पोहचली आहे.
कोविडबाबत प्रतिबंधक उपाययोजना न करणाऱ्यांना दंडाची तरतूद करणारे झारखंड हे पहिलेच राज्य नसून, देशातील इतर अनेक राज्यांनी मुखपट्टी न घालणाऱ्यांना दंड ठोठावण्याची तरतूद केली आहे.