झारखंड सरकारने जवळजवळ नऊ लाख शेतकऱ्यांचे ५० हजारांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सध्याच्या आर्थसंकल्पामधील दोन हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो), काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल (राजद) युतीने झारखंडमध्ये सरकार स्थापन करुन २९ डिसेंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अध्यक्षतेखाली बुधावारी पार पडलेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये या कर्जमाफीसंदर्भात निर्णय घेण्यात आला. राज्याचे अर्थमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. रामेश्वर उरांव यांनी यासंदर्भात माहिती दिली. “सरकारने सर्वात आधी लहान शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. पुढे दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात एक लाख रुपये आणि दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी देण्याचा आमचा प्रयत्न असेल,” असं उरांव म्हणाले.

मंत्रीमंडळाने शेतकऱ्यांना ही कर्जामाफी देण्यासाठी दोन हजार कोटी रुपये खर्च करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या पैशांमधून राज्यातील लहान शेतकऱ्यांनी किंवा शेत मजुरांनी कोणत्याही बँकेतून काढलेलं ५० हजारांपर्यंतच कर्ज माफ केलं जाणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमधील निर्णयानुसार सध्या राज्य सरकार ३१ मार्च २०२० पर्यंतचं कर्ज माफ करणार आहे. या योजनेअंतर्गत एका शेतकरी कुटुंबातील एकाच व्यक्तीच्या नावे असणारं कर्ज माफ केलं जाईल. कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना सांकेतिक स्वरुपाचे एक रुपयांचे शुल्क द्यावे लागेल. कर्जमाफीची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटीच्या माध्यमातून थेट जमा केली जाणार आहे.

निर्णय घेण्यास उशीर झाला…

झामुमोचे मुख्य प्रवक्ते सुप्रियो भट्टाचार्य यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. “करोनामुळे राज्य सरकारला हा निर्णय घेण्यासाठी थोडा उशीर झाला. मात्र आमच्या सरकारला एक वर्ष पूर्ण होण्याआधी सरकारने हे मोठं पाऊल उचलत शेतकऱ्यांना मदत करण्याची आपली इच्छा असल्याचे कृतीमधून दाखवून दिलं आहे,” असं मत भट्टाचार्य यांनी व्यक्त केलं. झारखंडचे मुख्य सचिव सुखदेव सिंह यांनी, “राज्यामध्ये एकूण १२ लाख ९३ हजार शेतकऱ्यांनी कृषी कर्ज घेतलं आहे. यापैकी जवळजवळ नऊ लाख शेतकऱ्यांची खात्यामध्ये पैसे जमा होतील,” अशी माहिती दिली.

लवकरच सर्वांची कर्ज माफ होणार

सिंह यांनी दिलेल्य माहितीनुसार राज्यातील शेतकऱ्यांनी जवळजवळ सहा हजार कोटींचं कर्ज घेतलं आहे. त्यापैकी दोन हजार कोटींचं कर्ज सरकारने माफ केलं आहे. काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते लाल किशोरनाथ शाहदेव यांनी कर्जमाफीचा हा पहिला टप्पा असून येत्या काळात दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात उरलेल्या सर्व शेतकऱ्यांची कर्ज माफ केली जातील असं म्हटलं आहे.