नवी दिल्लीत जवाहरलाल नेहरु विद्यापीठ विद्यार्थी संघटनेकडून आंदोलन सुरु असून यावेळी एका महिलेने पोलीस अधिकाऱ्याच्या हाताचा चावा घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. आंदोलनकर्त्यांना शास्त्री भवन येथे नेलं जात असताना अतिरिक्त पोलीस उपायुक्त सिंह यांच्या हाताचा एका महिलेने चावा घेतला. महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही.

गुरुवारी संध्याकाळी दिल्ली पोलीस आणि आंदोलकर्ते एकमेकांसोबत भिडले. गोंधळ सुरु असताना एक महिला अतिरिक्त पोलीस उपायुक्त सिंह यांच्या दिशेने चालत आली आणि त्यांच्या डाव्या हाताच्या बोटाचा चावा घेतला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपली सुटका करुन घेण्यासाठी अतिरिक्त पोलीस उपायुक्तांना झटापट करावी लागली. जखमी झाल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं.

जेएनयूच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा गुरुवारी राष्ट्रपती भवनकडे जात असताना पोलिसांना त्यांना रोखलं. जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. आंदोलनकर्त्यांना जनपथवर वाहतूक कोंडी करण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला. पोलिसांनी यावेळी आंदोलनकर्त्यांना शांतता बाळगण्याचं आवाहनही केलं होतं.