करोनाच्या दुसऱ्या लाटेचा नोकरदार वर्गाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे बेरोजगारीचा दर जूनमध्ये १३ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. सलग चौथ्या महिन्यातील रोजगाराच्या आकडेवारीवरदेखील याचा परिणाम झाला आहे. सीएमआयईच्या (सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी) ताज्या अहवालानुसार मे २०२१ मध्ये सुमारे १५ दशलक्ष लोकांनी रोजगार गमावले गेले आहेत. प्रत्यक्षात मे महिन्यात कामगारांच्या सहभागाचा दर जो ३५ टक्के होता तो जूनमध्ये ३४ टक्क्यांवर आला आहे. परंतु यामध्येही सर्वात जास्त फटका २५ वर्षांखालील आणि महिला नोकरदारांना बसला आहे, असे नुकतेच लिंक्डइन सर्वेक्षणात दिसून आले.

करोना साथीच्या दुसर्‍या लाटेमुळे नोकऱ्यामध्ये महिला आणि तरुणांच्या चिंतेत वाढ झाली आहे. त्यांना केवळ नवीन नोकरी शोधणे कठीण जात नसून अनुभव आणि व्यावसायिक संबंधाशिवाय सध्याच्या नोकरी टिकवणेही अवघड झाले आहे. कोविड -१९ च्या दुसर्‍या लाटेमुळे युवकांमध्ये अनुभवाचे आणि संबंधाचे महत्त्व वाढले आहे. त्याशिवाय वृद्ध आणि अनुभवी साथीदारांच्या तुलनेत तरुणांच्या कारकीर्दीची चिंता दुप्पट झाली आहे असे लिंक्डइन वर्कफोर्स कॉन्फिडेंस इंडेक्सच्या अहवालात म्हटले आहे.

भारतातल्या IT क्षेत्रातल्या ३० लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार? – बँक ऑफ अमेरिका

नोकरी नसल्यामुळे कोण किती काळजीत

लिंक्डइनच्या अहवालानुसार, जनरेशन झेड म्हणजेच १९९७ नंतर जन्मलेल्या नोकरदारांपैकी जवळजवळ ३० टक्के तरुण, २६ टक्के मिलेनियल्स (१९८१ ते १९९६ दरम्यान जन्मलेले) आणि बेबी बुमर्समधील १८ टक्के (१९४६ ते १९६४ मधील जन्मलेले) नोकरीच्या अभावामुळे चिंतेत आहेत. या व्यतिरिक्त, नवीन पदवीधरांना नोकरी मिळण्यासाठी लागणारा सरासरी वेळ २०१९च्या तुलनेत कोविड-१९ नंतर २०२० मध्ये ४३ टक्के (२ ते २.८ महिने) इतका वाढला आहे. ८ मे ते ४ जून २०२१ दरम्यान करण्यात आलेल्या सर्वेक्षणात १,८९१ नोकरदारांद्वारे मिळलेल्या माहितीतून तयार करण्यात आला आहे. नोकरी शोधण्याबरोबरच पैशाची जमा करण्याची वेळ येते तेव्हा बुमर्सपेक्षा तरुणांमध्ये जास्त अनिश्चितता असते. २४ टक्के मिलेनियल्स लोक त्यांच्या कर्जाबाबत किंवा वाढत्या खर्चाबद्दल चिंतेत आहेत. बुमरर्सच्या बाबतीत ही आकडेवारी १३ टक्के आहे.

कर्ज किंवा खर्चाबद्दल महिला अधिक काळजीत

नोकरदार महिलांच्या बाबतीत, २३ टक्के महिला या कर्ज किंवा वाढत्या खर्चाबद्दल चिंतेत आहेत, तर पुरुषांच्या बाबतीत ही संख्या १३ टक्के आहे. सर्वेक्षणात म्हटले आहे की दुसर्‍या लाटेमुळे नोकरीच्याबाबतीत महिलांमध्ये अधिक असंतोष निर्माण झाला आहे. काम करणाऱ्या पुरुषांच्याऐवजी दोन पट जास्त महिलांना नोकरीबदद्ल आणि मिळवण्यासाठी लागणाऱ्या वेळेबद्दल चिंता आहे. यामुळेच महिला व्यावसायिकांचे वैयक्तिक आत्मविश्वास निर्देशांकातील गुण मार्चच्या सुरुवातीला असलेले +५७ वरून जूनमध्ये +४९ पर्यंत घसरला आहे, जो काम करणाऱ्या पुरुषांपेक्षा चार पट कमी आहे.