उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पत्रकार विक्रम जोशी यांच्या  कुटुंबाला १० लाख रुपयांची आर्थिक मदत आणि कुटुंबातील एकदा सदस्याला सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली आहे. सोमवारी रात्री विक्रम जोशी यांच्यावर गाझियाबादमधील त्यांच्या घराजवळ गोळया झाडण्यात आल्या. गंभीर जखमी झालेल्या विक्रम जोशी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला.

पत्रकार विक्रम जोशी यांच्यावर त्यांच्या दोन मुलींसमोर सोमवारी रात्री गोळया झाडण्यात आल्या. विजय नगर भागात ही धक्कादायक घटना घडली. या हत्येचे उत्तर प्रदेशच्या राजकारणात तीव्र पडसाद उमटले आहेत. “योगी सरकारने विक्रम जोशी यांच्या कुटुंबाला १० लाख रुपयांची आर्थिक मदत आणि त्यांच्या पत्नीला सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली आहे” गाझिया बादच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

आणखी वाचा- “वचन होतं राम राज्याचं, दिलं गुंडाराज”; योगी सरकारवर राहुल गांधींची टीका

विक्रम जोशी एका स्थानिक हिंदी वर्तमानपत्रामध्ये काम करायचे. सोमवारी रात्री विक्रम जोशी त्यांच्या दोन मुलींसह दुचाकीवरुन घरी चालले होते. आरोपींनी माता कॉलनीजवळ त्यांच्यावर गोळया झाडल्या. जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात गोळीबाराची ही घटना कैद झाली. वडिलांवर गोळया झाडल्यामुळे भांबावलेली मुलगी मदतीसाठी आरडाओरडा करताना या व्हिडीओमध्ये दिसते. विक्रम जोशी यांच्या मृत्यूनंतर आणखी तीन जणांना अटक केल्याची माहिती उत्तर प्रदेश पोलिसांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत नऊ जणांना अटक केली आहे.