दिवसोंदिवस देशामध्ये करोनाग्रस्तांची संख्या वाढत असतानाच स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नावरुन देशातील राजकारणही चांगलेच तापले आहे. उत्तर प्रदेशमध्ये बस गाड्यांची व्यवस्था करण्यापासून ते काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी स्थलांतरित मजुरांबरोबर मारलेल्या गाप्पांपर्यंत अनेक विषयावरुन भाजपा विरुद्ध काँग्रेस असा शाब्दिक संघर्ष सुरु झाला आहे. असं असतानाच आता कर्नाटक भाजपाने थेट काँग्रेसच्या माजी पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे. आधीच्या पंतप्रधानांनी देशासाठी काम केलं असतं तर आज स्थलांतरितांवर ही वेळ आली नसती असा टोला कर्नाटक भाजपाने ट्विटवरुन लगावला आहे.

“माजी पंतप्रधान असणाऱ्या नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सुपर पीएम असणाऱ्या सोनिया गांधी यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये भारतासाठी काम केलं असतं तर या स्थलांतरित मजुरांना २०२० मध्ये कामासाठी एवढे कष्ट घ्यावे लागले नसते. या लोकांनी फक्त गांधींच्या घरण्यासाठी काम केलं नाही का राहुल गांधी?”, असे ट्विट कर्नाटक भाजपाच्या औपचारिक ट्विटर अकाउंटवरुन करण्यात आलं आहे.


१६ मे रोजी राहुल गांधी यांनी दिल्लीमधून पायी निघालेल्या काही स्थलांतरित मजुरांबरोबर चर्चा करुन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. सुखदेव विहार या ठिकाणाहून हरयाणातून झाँसीच्या दिशेने चालत निघालेल्या मजुरांशी राहुल यांनी चर्चा केली. राहुल यांनी त्यांच्या व्यथा जाणून घेतल्यानंतर काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी वाहनांची व्यवस्था केली. याचसंदर्भातील व्हिडिओ राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी ट्विट केला. तोच व्हिडिओ कोट करुन रिट्विट करत कर्नाटक भाजपाने स्थलांतरितांना सध्या सामना करावा लागत असलेल्या अडचणींसाठी नेहरु आणि गांधी कुटुंबाला जाब विचारला आहे.

Story img Loader