देशात करोना संकटाशी लढा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. तसेच रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी देशातील सर्वच राज्यांनी लॉकडाउनसारखा कठोर निर्णय घेतला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात रुग्णसंख्या आटोक्यात आली असली मृतांचा आकडा चिंता वाढवणारा आहे. देशात इतकं मोठं संकट असताना कर्नाटकातील भाजपा आमदाराने अग्निहोत्रा हवन मिरवणूक काढत करोना विषाणू रोखण्याचा दावा केला आहे. त्यांच्या हवन मिरवणुकीवर विरोधकांनी टीकेचे बाण सोडले आहेत.

कर्नाटकातील भाजपा नेते आणि आमदार अभय पाटील यांनी अग्निहोत्र हवन मिरवणुकीचं आयोजन केलं होतं. बेळगाव शहरात त्यांनी ही हवन यात्रा काढली. या हवन मिरवणुकीमुळे करोनाचे विषाणू पळून जातील असा त्यांनी दावा केला आहे. करोना रोखण्यासाठी सरकारने घालून दिलेले नियम पायदळी तुडवले गेले असल्याचं यावेळी दिसून आलं. या मिरवणुकीत मोठ्या संख्येनं लोकांनी भाग घेतला होता. शेणी, कापूर, कडुलिंबाची पानं, गुग्गुला आणि इतर औषधी वनस्पती या हवनात टाकण्यात आली होती. हा हवन ठराविक भागात फिरवण्यात आला. त्या हवानातील धुरामुळे करोनाचे विषाणू दूर होतील असा दावा यावेळी भाजपा आमदार अभय पाटील यांनी केला.

“माझा आयुर्वेदावर खूप विश्वास आहे. त्यामुळे आयुर्वेदीक औषधं घेण्याचा मी सल्ला देतो. या हवनामुळे करोनाचे विषाणू नष्ट होण्यास मदत होईल” , असा दावा भाजपा आमदार अभय पाटील यांनी केला आहे. दक्षिण बेळगाव मतदारसंघातून अभय पाटील तीन वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. “हवन माझ्या घरासमोर करण्यात आला. आणि त्यात फक्त ५० माणसं होती. त्यामुळे करोना नियमांचं कुठेच उल्लंघन झालं नाही. अग्निहोत्र हवन एक विज्ञान आहे. हिंदूसाठी हवन विज्ञानासारखं आहे. त्यामुळे तुम्हाला ते कळणार नाही. त्यामळे चर्चा करण्यात अर्थ नाही” असंही त्यांनी पुढे सांगितलं. तसेच मतदारसंघात हवनविधी १५ जूनपर्यंत सुरू राहील असंही त्यांनी स्पष्ट केलं.

चिंता वाढवणारी बातमी : दैनंदिन रुग्णसंख्या पुन्हा दोन लाखांच्या वर; मृत्यूच्या प्रमाण वाढ तर बरं होणाऱ्यांच्या संख्येत घट

बेळगाव जिल्ह्यात गेल्या २४ तासात १७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ७४७ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५७ हजार ८४६ जणांना करोनाची लागण झाली आहे. तर १७ हजार ४४१ सक्रिय रुग्ण आहेत.