कर्नाटकमधील एच.डी. कुमारस्वामी यांचे सरकार कोसळल्यानंतर सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील सरकारचं भवितव्य आज ठरणार आहे. आमदारांच्या बंडखोरीनंतर होत असलेल्या विधानसभेच्या १५ जागांवरील पोटनिवडणुकीचा निकाल लागणार आहे. मतमोजणीला सुरूवात झाली असून, या १५ जागांपैकी ६ जागांवर विजय मिळवणे येडियुरप्पा सरकारच्या अस्तित्वासाठी महत्वाचं असणार आहे.
जेडीएसचे नेते एच.डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील सरकार असताना काँग्रेस आणि जेडीएसमधील १७ आमदारांनी बंडखोरी शस्त्र उपसले होते. बंडखोरीमुळे कुमारस्वामी यांचे सरकार जुलै महिन्यात कोसळले. त्यानंतर कर्नाटकात मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली भाजपानं सरकार स्थापन केलं. २२४ सदस्यसंख्या असलेल्या कर्नाटक विधानसभेच संख्याबळ १७ आमदारांच्या बडतर्फीनंतर २०८ वर आले होते. त्यानंतर येडियुरप्पा यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला होता. सध्या भाजपाचे १०५ आमदार असून, सत्तेवर विराजमान राहण्यासाठी त्यांना ६ आमदारांचं संख्याबळ आवश्यक आहे.
दरम्यान, आमदारांच्या बंडखोरीनंतर कर्नाटकात विधानसभेच्या १५ जागांसाठी पोटनिवडणुका घेण्यात आल्या. ५ डिसेंबर रोजी यासाठी मतदान झालं असून, ६७.९१ टक्के मतदान झाले आहे. आज (९डिसेंबर) पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. दुपारपर्यंत १५ जागांवरील चित्र स्पष्ट होणार आहे.
Karnataka: Counting of votes for #KarnatakaBypolls begins at 15 counting stations. https://t.co/2Q0iW8Ckm2
— ANI (@ANI) December 9, 2019
कोण मारणार बाजी?
भाजपासह काँग्रेस, जेडीएससाठी ही पोटनिवडणूक महत्त्वाची आहे. या निकालात आपणच बाजी मारणार असल्याचा दावा करत सत्ताधारी आणि विरोधक यांनी सत्तास्थापन करण्याचा आत्मविश्वास व्यक्त केलेला आहे. भाजपकडून निवडणूक लढवणाऱ्या बंडखोर उमेदवारांना मतदार घरी पाठवेल, असा विश्वास काँग्रेसने व्यक्त केला आहे. तर भाजप सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी व्यक्त केला आहे. स्थानिक वृत्त वाहिन्यांच्या एक्झिट पोलनुसार या पोटनिवडणुकीत भाजप ९ ते १२ जागा जिंकेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे.