सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी कर्नाटक विधासभेत बहुमत सिद्ध करुन दाखवू असा दावा केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले कि, सर्वोच्च न्यायालयाने जो आदेश दिला आहे त्याचे पालन केले जाईल. मुख्य सचिवांशी चर्चा करुन उद्याच विधानसभेचे सत्र बोलवू. उद्या आम्ही सभागृहात बहुमत सिद्ध करुन दाखवू याची १०० टक्के खात्री आहे असे येडियुरप्पा म्हणाले.
कर्नाटक विधानसभेत शनिवारी संध्याकाळी चार वाजता बहुमत सिद्ध करावे, असे आदेश सुप्रीम कोर्टाने सत्ताधारी भाजपाला दिले आहेत. बहुमत चाचणी सोमवारी घ्यावी, ही भाजपाची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे.
राज्यपालांच्या निर्णयाची वैधता तपासण्याऐवजी कोणलाही अतिरिक्त वेळ न देता शनिवारीच विधानसभेत बहुमत चाचणी घेता येईल, असे सुप्रीम कोर्टाने सांगितले. यावर काँग्रेसची बाजू मांडणारे अभिषेक मनू सिंघवी म्हणाले, पण सर्वप्रथम बहुमत सिद्ध कोणी करायचे. काँग्रेस- जेडीएस युतीने की भाजपाने. यावर न्या. सिक्री म्हणाले, ज्याला कोणाला संधी मिळेल त्याने बहुमत सिद्ध करावे. शेवटी बहुमत चाचणीत विधानसभेचा कौल महत्त्वाच असतो.
सर्व बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यावर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. शनिवारी संध्याकाळी चार वाजता विधानसभेत बहुमत चाचणी घ्यावी, असे कोर्टाने सांगितले. येडियुरप्पा सरकारने बहुमत चाचणीपर्यंत कोणतेही धोरणात्मक निर्णय घेऊ नये, असे मत सुप्रीम कोर्टाने व्यक्त केले. यावर भाजपाची बाजू मांडणाऱ्या रोहतगी यांनी तसे प्रतिज्ञापत्र देण्याची तयारीही दर्शवली. तसेच पोलीस महासंचालकानी बहुमत चाचणीच्या वेळी विधीमंडळाच्या आवारात कडेकोट बंदोबस्त ठेवावा, असेही कोर्टाने सांगितले.
Will discuss with Chief secretary and call for assembly session tomorrow. We are 100% confident that we will prove full majority: #Karnataka CM BS Yeddyurappa on Supreme Court’s order for floor test pic.twitter.com/oE8V9q3sIu
— ANI (@ANI) May 18, 2018