महापूराच्या थैमानानंतर आता कुठे केरळमध्ये पावसाचा जोर ओसरु लागला असून, राज्यातून ‘रेड अलर्ट’ हटवण्यात आला आहे. असं असलं तरीही आता राज्यामध्ये आता पूरामुळे झालेलं एकंदर नुकसान आणि त्यानंतर उदभवणाऱ्या अडचणी या सर्व गोष्टींसाठी मोठ्या धीराने उभं राहण्याची गरज असल्याचं मत केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी मांडलं आहे. खुद्द विजयन गेल्या बऱ्याच दिवसांपासून या अडचणीच्या वेळी आपल्या राज्यासाठी मदतीचं आवाहन करत असल्याचंही पाहायला मिळालं होतं.

‘अडचणीचा एक टप्पा कुठे आता संपण्याच्या मार्गावर आहे. पण, केरळमधील जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी आता बराच अवधी लागणार असून, राज्यशासनावर ही एक मोठी जबाबदारी असणार आहे’, असं ते म्हणाले.
केरळमध्ये सुरु असणारं बचाव कार्य आणि स्वयंसेवी संस्थांनी या कार्यात लावलेला हातभार या सर्व गोष्टींना अधोरेखित करत त्यांनी येत्या काही दिवसांमध्ये स्वच्छता आणि रोगराईवर नियंत्रण या गोष्टींकडे जास्त लक्ष देण्यात येणार असल्याचंही स्पष्ट केलं. ‘सध्याच्या घडीला सर्वाच मोठी अडचण असणार आहे, ती म्हणजे पाण्यातून पसरणारे आणि साथीचे आजार रोखण्याची. पूरामुळे साचलेलं पाणी हटवण्यासाठी सर्वच प्रयत्नशील असून, त्यानंतर या सर्व भागामध्ये ब्लिचींग पावडरचा शिडकावा करण्यात येणार आहे. या सर्व कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक स्वयंसेवी संघटनांनी सहकार्य करावं’, असंही ते म्हणाले.

येत्या काळात पूर पूर्णपणे ओसरल्यानंतर सहा आरोग्य अधिकाऱ्यांच्या निरीक्षणाअंतर्गत सर्व ग्रामपंचायतींमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करण्यात येणार आहे. त्यासोबत कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन होण्यासाठीही एक यंत्रणा स्थआपन करण्यात येणार आहे. विविध शिबिरांमध्ये असणाऱ्या पूरग्रस्तांपैकी कोणाला तातडीने उपचारांची गरज असल्यास त्यांना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात येण्यासाठीही राज्यशासन पुढे येईल असं त्यांनी सांगितलं.
सध्याच्या घडीला फक्त आरोग्यच नव्हे तर शिक्षणाच्या दृष्टीनेही केरळ राज्यशासनाने काही महत्त्वाची पावलं उचलली आहेत. साक्षरता यादीत अव्वल स्थानी येणाऱ्या या राज्यात पुराच्या पाण्यामुळे बरंच नुकसान झालं असून, पुस्तकं आणि शालेय साहित्यंही त्यात वाहून गेलं. पण, या एकाच कारणामुळे या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी शाळा नियमितपणे सुरु झाल्यानंतर शासनाकडूनच विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकांचं आणि गणवेशाचंही वाटप करण्यात येणार आहे.

वाचा : निपाहमुळे जीव गमावणाऱ्या नर्सच्या पतीची माणूसकी, पहिला पगार पूरग्रस्तांना

राज्यशासनाकडून केरळमधील पूरग्रस्तांचं आयुष्य पूर्वपदावर आणण्यासाठी हिरीरिचे प्रयत्न सुरु असून, खुद्द मुख्यमंत्री विजयन यात जातीने लक्ष घालत आहेत. आपल्या राज्याला अडचणीच्या या प्रसंगात ज्यांनी मदतीचा हात पुढे केला त्यांचेही त्यांनी आभार मानले आहेत. सोबतच समाजापुढे अनेक कारणांनी आदर्श प्रस्थापित करणाऱ्या आपल्या राज्याची पुनर्बांधणी करण्यासाठीच आता राज्यशासन प्रयत्नशील असेल, असं म्हणत पी. विजयन यांनी आपला आशावादी दृष्टीकोन मांडला.