जवळपास महिन्याभरापासून केरळमध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं. राज्यातील ३५ धरणं भरल्यामुळे केरळमधील गाव अन् गाव पाण्याखाली आलं होतं. गल्लीबोळ म्हणू नका किंवा मग मोठमोठी घरं आणि विमानतळं. सर्वकाही अगदी जलमय झालं होतं. अनेकांना या पूरात आपला जीवही गमवावा लागला. या पुरात झालेली जीवित आणि वित्तहानी तर अनेकांच्या काळजात चर्रर्र करुन गेली. अशा या देवभूमीमध्ये झालेला निसर्गाचा कोप पाहून, अनेकांना धक्का बसला.

दक्षिणेकडील सर्वाधिक सुंदर राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणची झालेली वाताहात थांबवण्यासाठी आणि परिस्थितीतून सावरण्यासाठी सैन्यदलापासून देशवासिय आणि परदेशात असलेल्या भारतीयांनीही सढळ हस्ते मदत केली. इतकंच काय, तर केरळातील मासेमारांनीही आपल्या साथीदारांचे प्राण वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अडचणीच्या या वेळी केरळसाठी अविरत प्रार्थना करणाऱ्या आणि या राज्याची मदत करण्यासाठी धावून आलेल्या प्रत्येकाचेच आता आभार मानण्यात येत आहेत. यामध्ये अमूलही मागे राहिलेलं नाही.

दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादनांमध्ये आघाडीवर असणाऱ्या अमूलने नुकतच एक सुरेख असं चित्र साकारत केरळच्या पूराकडे पुन्हा एकदा लक्ष वेधलं आहे. या चित्रामध्ये अमूलची ती प्रसिद्ध बाहुली आणि बाहुला एका बोटमध्ये बसलेले दिसत असून, त्यांच्या बचावासाठी आलेल्यांच्या साथीने ते पुराच्या पाण्यातून बाहेर पडत आहेत. ‘गॉड प्लीज हेल्प युवर ओन कंट्री’, म्हणजेच देवा तुझ्या या भूमीला आता तूच वाचव असं या चित्रावर लिहिण्यात आलं असून, ही टॅगलाईन त्या चित्राला अतिशय समर्पक ठरत आहे. त्यासोबतच तुमच्या प्रार्थना आणि योगदानाच्या माध्यमातून केरळवासियांची मदत करा असं आवाहनही अमूलतर्फे करण्यात आलं आहे.

वाचा : निपाहमुळे जीव गमावणाऱ्या नर्सच्या पतीची माणूसकी, पहिला पगार पूरग्रस्तांना

दरम्यान, सध्याच्या घडीला केरळमधील पूराचा धोका कमी झाला असून, बचावकार्यास वेग आला आहे. या पूरात आतापर्यंत तीनशेहून अधिक स्थानिकांना प्राण गमवावे लागले आहेत. तर, मोठ्या संख्येवर येथे अनेकांचा निवाराही पूरात वाहून गेला आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार केरळमध्ये जवळपास १९ हजार कोटींचं नुकसान झाल्याचं लक्षात येत आहे. येत्या काळात हा आकडा वाढण्याचीही चिन्हं आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने या देवभूमीची सर्व सूत्र आता देवाच्याच हातात असल्याचं म्हणत, देवाक् काळजी हीच प्रतिक्रिया अनेकजण देत आहेत.