मंगळवारी दिवाळीच्या जवळपास महिनाभर आधीच मध्य प्रदेशच्या पन्ना जिल्ह्यातील एका मजुराच्या कुटुंबियांनी दिवाळी साजरी केली. कारण येथील मोतीलाल प्रजापती या खाण मजुराला 42.9 कॅरेटचा एक मौल्यवान हिरा सापडला. मध्य प्रदेशमधील पन्ना जिल्हा हिऱ्याच्या खाणींसाठी प्रसिद्ध आहे.

42.9 कॅरेटचा हा हिरा या जिल्ह्याच्या इतिहासातील दुसरा सर्वात मोठा हिरा असल्याचं सांगण्यात येत आहे. यापूर्वी येथे 1961 मध्ये 44.55 कॅरेटचा हिरा सापडला होता. पन्ना येथील हिरा कार्यालयातील अधिकारी अनुपम सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा-कल्याणपूर गावाजवळील एका खाणीत मजुर मोतीलाल आणि त्याच्या चार अन्य सहकाऱ्यांना हा हिरा सापडला. हिरा सापडल्यानंतर लगेचच मोतीलाल आणि त्याच्या सहकाऱ्यांनी कार्यालयात येऊन हिरा जमा केला, अद्याप या हिऱ्याचं मुल्यांकन करण्यात आलेलं नाही अशी माहिती त्यांनी दिली. तर हीरा कार्यालयातील अन्य एक अधिकारी संतोष सिंग यांनी हा हिरा मौल्यवान असून त्याची किंमत दीड कोटींपेक्षा जास्त असू शकते, असं सांगितलं.

पुढील जानेवारी महिन्यात हिऱ्याचा लिलाव केला जाईल, येणाऱ्या रक्कमेतून सरकारी नियमांनुसार पैसे कापले जातील आणि मोतीलालला उर्वरित रक्कम दिली जाईल, अशी माहिती अनुपम सिंह यांनी दिली. हा माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबियांसाठी सर्वाधिक आनंदाचा क्षण आहे. लिलावानंतर मिळणारे पैसे सर्व सहकाऱ्यांमध्ये वाटून घेतले जातील. हे पैसे माझ्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कामाला येतील, आणि कुटुंबाच्या सर्व गरजा भागतील असं मोतीलाल म्हणाला.