राहुल गांधी यांच्या ‘नाश्ता बैठकी’त १५ पक्षांच्या नेत्यांचा सहभाग

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्यानंतर, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही विरोधकाच्या एकजुटीची हाक दिली. दिल्लीच्या कन्स्टिटय़ुशन क्लबमध्ये मंगळवारी झालेल्या ‘नाश्ता बैठकी’त १५ विरोधी पक्षांचे नेते सहभागी झाले होते. पेगॅसस, शेती कायदे, इंधन दरवाढ अशा लोकांशी संबंधित मुद्यांवर केंद्र सरकारविरोधात विरोधकांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन राहुल गांधी यांनी केले.

विरोधकांनी एकत्र यावे या एकमेव उद्देशाने तुम्हाला (विरोधी पक्षांच्या नेत्यांना) आमंत्रण दिले आहे. आपण जेवढी एकी दाखवू तेवढी आपली ताकद वाढले मग, भाजप आणि संघाला आपला आवाज दाबून टाकता येणार नाही, असे राहुल गांधी यांनी विरोधी पक्ष नेत्यांना उद्देशून केलेल्या भाषणात सांगितले.

इंधन दरवाढीच्या मुद्दय़ावर केंद्राचे आणि लोकांचे लक्ष वेधण्यासाठी आपण सायकलवरून संसदेत जाऊ, त्याचा प्रभाव पडेल, असे राहुल यांनी सुचवले. बैठकीनंतर राहुल गांधी आणि काँग्रेसचे नेते सायकलवरून संसदेत गेले.

काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, द्रमूक, राष्ट्रीय जनता जनता दल, डावे पक्षांचे नेते सहभागी बैठकीत झालेले होते. मात्र, बहुजन समाज पक्ष, आम आदमी पक्ष, एमआयएम या पक्षांनी बैठकीकडे पाठ फिरवली. तृणमूल काँग्रेसचे सौगत राय, महुआ मोइत्रा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, द्रमूकच्या कणिमोळी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेत मल्लिकार्जुन खरगे, अधीररंजन चौधरी, शशी थरूर तसेच, काँग्रेसचे खासदार उपस्थित होते.

या बैठकीला ६० टक्के विरोधी पक्षांचे नेते आलेले होते. हा ऐतिहासिक दिवस होता. विरोधकांच्या एकजुटीची ही नवी सुरुवात असून २०२४ मधील राजकारणाचे नवे चित्र असल्याचे काँग्रेसचे प्रवक्ता अभिजित मनु सिंघवी म्हणाले.

अखेरचे तीन दिवस?

‘पेगॅसस’च्या मुद्दय़ावरून झालेली संसदेतील कोंडी फुटण्याची शक्यता संपुष्टात आल्यामुळे या आठवडय़ाच्या अखेरीस संसदेचे पावसाळी अधिवेशन गुंडाळले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पेगॅसस असो वा अन्य कोणताही विषय संसदेचे कामकाज सुरू राहायचे असेल तर दोन्ही बाजूने तडजोड होणे आवश्यक असते पण, तशी शक्यता नसल्याने संसदेचे अधिवेशन मुदतपूर्व संपू शकेल, असे सत्ताधारी पक्षाच्या नेत्याने सांगितले.

७ ऑगस्ट रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंत्र्यांच्या भोजनांचा कार्यक्रम आयोजित केला असल्यामुळे पावसाळी अधिवेशन आणखी चार दिवस सुरू राहू शकेल. संसदेच्या अधिवेशनाचा हा तिसरा आठवडा असून मंगळवारीही दोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांचा गोंधळ कायम राहिला.

या गदारोळात लोकसभेत कोणत्याही चर्चेविना अत्यावश्यक संरक्षण सेवा विधेयक मंजूर करण्यात आले. राज्यसभेत दिवाळखोरीसंदर्भातील दुरुस्ती विधेयक मंजूर झाले. लोकसभेत गेल्या आठवडय़ात ते मंजूर करण्यात आले होते.

विरोधकांकडून संविधानाचा, संसदेचा अपमान- मोदी

संसदेच्या सभागृहांमध्ये विरोधकांनी कार्यक्रमपत्रिकांची फाडाफाडी केली गेली. मंत्र्यांच्या हातून कागद हिसकावून घेतले गेले. सातत्याने कामकाज बंद पाडले गेले. विरोधकांची ही कृत्ये संविधानाचा आणि संसदेचा अपमान असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत केली. पाच-सात मिनिटांमध्ये केंद्र सरकार विधेयक संमत करत असल्याबद्दल तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार डेरेक ओब्रायन यांनी ही विधेयकाला मंजुरी होती की, पापडी चाट बनवले जात होते, अशी खोचक टीका केली. त्याबद्दलही मोदींनी नाराजी व्यक्त केली. आम्हाला सर्व  विधेयकांवर चर्चा करायची आहे, घाईगडबडीत विधेयके  मंजूर करण्याची सरकारचीही इच्छा नाही. तृणमूल काँग्रेसच्या सदस्याने केलेली टिप्पणी संसदेचा अपमान असून त्यांनी देशाची माफी मागितली पाहिजे, असे संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद  जोशी म्हणाले.