जपानमधील सरकारी कर्मचाऱ्यांवर सध्या पगार कपातीची कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई करण्यामागील कारण आहे, नियोजित कार्यालयीन वेळेच्या दोन मिनिटं आधी ऑफिसमधून निघणं. होय तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण केवळ दोन मिनिटं आधी ऑफिसमधून निघाणाऱ्या जपानमधील सरकारी कर्मचाऱ्यांवर सध्या पगार कपातीच्या कारवाईला सामोरं जावं लागण्याची वेळ आलीय. ‘जपान टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार, चिबा येथील द फुनाबाशी सिटी बोर्ड ऑफ एज्युकेशनने १० मार्च रोजी एक महत्वाची घोषणा केली आहे. नियोजित वेळेच्या दोन मिनिटं आधी ऑफिसमधून घरी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार कापला जाणार असल्याचं बोर्डानं स्पष्ट केलं आहे.
शिक्षण विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार येथे काम करणाऱ्या सात कर्मचारी मे २०१९ ते जानेवारी २०२१ च्या कालावधीमध्ये तब्बल ३१६ वेळा नियोजित वेळेआधीच ऑफिसमधून घरी गेले. सानकीया न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार या विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सव्वापाच वाजता ऑफिसमधून निघणं अपेक्षित असतं. मात्र पगार कपात झालेले कर्मचारी पाच वाजून १३ मिनिटांनीच आऊट पंच करुन घरी निघायचे. ५:१७ ची बस पकडण्यासाठी हे कर्मचारी कार्यालयामधून लवकर बाहेर पडायचे. ही ५:१७ ची बस सुटल्यानंतर थेट अर्ध्या तासाने बस असल्याने आम्ही लवकर ऑफिसमधून निघायचो, असं कर्मचाऱ्यांनी स्पष्टीकरणामध्ये म्हटलं आहे.
या कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांच्या हजेरीची नोंद ठेवणाऱ्या समितीमध्ये कामाला असणाऱ्या ५९ वर्षीय महिलेने इतर कर्मचाऱ्यांना नियोजित वेळेआधी ऑफिसमधून घरी जाण्यासाठी मदत केल्याचा आरोप केला जात आहे. ही महिला घरी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आऊट टाइम बदलायची असं सांगण्यात येत आहे. पुढील तीन महिन्यासाठी या महिलेचा पगार कापण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन कर्मचाऱ्यांना लेखी इशारा देण्यात आला आहे. तर इतर कर्मचाऱ्यांना वेळेआधी कार्यालय न सोडण्यासंदर्भात सक्त ताकीद देण्यात आलीय.
जपानमधील जवळजवळ सर्वच कंपन्यांमध्ये आणि कार्यालयांमध्ये वक्तशीरपणाला फार महत्व दिलं जातं. येथील वर्क कल्चरमध्ये वक्तशीरपणाला फार महत्व असल्यानेच एकदा नियोजित वेळेच्या काही सेकंद आधी ट्रेन सोडल्यासंदर्भात रेल्वे प्रशासनाने जाहीर माफी मागणारं पत्र प्रसिद्ध केलं होतं.