लष्करात पुरुषांच्या बरोबरीने स्थान मिळण्यासाठीची एक मोठी लढाई महिलांनी सर्वोच्च न्यायालयात नुकतीच जिंकली असताना मेजर जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांना शनिवारी लेफ्टनंट जनरल पदावर बढती देण्यात आली. कानिटकर यांची लेफ्टनंट जनरलपदी निवड गेल्या वर्षीच झाली होती, पण जागा रिक्त झाल्यानंतर त्यांनी शनिवारी पदभार स्वीकारला. या उच्च पदावर पोहोचलेल्या त्या पहिल्याच मराठी महिला अधिकारी आहेत.

नवी दिल्ली येथे त्यांनी एकात्मिक संरक्षण विभागाच्या उपप्रमुख (सीडीएस- वैद्यकीय) म्हणून सूत्रे हाती घेतली आहेत. हा विभाग संरक्षण प्रमुख यंत्रणेच्या अंतर्गत आहे. लष्करात या श्रेणीचे पद मिळवणाऱ्या कानिटकर या तिसऱ्या महिला अधिकारी असून त्या बालरोगतज्ज्ञ आहेत. कानिटकर यांचे पती राजीव लष्करात लेफ्टनंट कर्नल होते. ते नुकतेच निवृत्त झाले. पती-पत्नीने लष्करात लेफ्टनंट कर्नलपद भूषवल्याची ही पहिलीच घटना आहे.

डॉ. कानिटकर यांनी लष्करात ३७ वर्षे सेवा केली आहे. सीडीएस-वैद्यकीय पदावर त्यांची नियुक्ती झाली आहे. भारतीय लष्कराच्या तिन्ही सेवांबाबत (हवाई दल, नौदल आणि स्थलसेना) केंद्र सरकारला सल्ला देण्याचे काम त्या करतील. दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना लेफ्टनंट जनरल कानिटकर म्हणाल्या, ‘‘भारतीय लष्कराचे कामकाज महिलांच्या दृष्टिकोनातून विचार करता पारदर्शक, न्याय्य असून महिलांना तेथे कर्तृत्व दाखवण्याची संधी निश्चितच मिळते. लष्करी वेशात असतानाही प्रत्येक दिवस मुलाच्या उत्साहात आनंदाने साजरा करा, अशक्य ते साध्य करण्याचे आव्हान तुम्ही स्वत:च स्वत:ला द्या. कधीही हार मानू नका. निम्मे जग तर महिलांचेच आहे, पण सेवेसाठी सगळे जग तुमच्यासाठी खुले आहे. त्यामुळे तुमच्यातील जे उत्तम असेल ते देशासाठी द्या.’’

कानिटकर यांची झेप

माधुरी कानिटकर पुण्याच्या आर्म्ड  फोर्सेस मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनी असून त्यांना राष्ट्रपतींचे सुवर्णपदक मिळाले होते. त्यांनी बालरोग विषयात पदव्युत्तर पदवी घेतली. अखिल भारतीय आयुर्विज्ञान केंद्रातून बालकांच्या मूत्रपिंड विकारांवर उपचाराचे प्रशिक्षण घेतले आहे. त्या पंतप्रधानांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान सल्लागार मंडळाच्या सदस्या आहेत. त्या लष्करी दलातील पहिल्या प्रशिक्षित बाल मूत्रपिंडविकार तज्ज्ञ आहेत. पुणे आणि दिल्लीत त्यांनी मुलांच्या मूत्रपिंड विकारावर उपचारासाठी केंद्रे स्थापन केली आहेत. २०१७ मध्ये त्या पुण्याच्या आम्र्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजच्या पहिल्या अधिष्ठाता होत्या. तेथे दोन वर्षे काम केल्यानंतर त्यांनी उधमपूर येथे मेजर जनरल (वैद्यकीय) पदाची जबाबदारी स्वीकारली. लष्करातील महिलांसाठी २०२० हे संस्मरणीय वर्ष ठरले असून याच वर्षी लष्करी दिन आणि प्रजासत्ताक दिन संचलनाचे नेतृत्व प्रथमच तानिया शेरगील या महिला लष्करी अधिकाऱ्याने केले होते.

भारतीय लष्करात महिलांना कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळते. अशक्य ते साध्य करण्याचे आव्हान तुम्ही स्वत:च स्वत:ला द्या. कधीही हार मानू नका. निम्मे जग तर महिलांचेच आहे, पण सेवेसाठी सगळे जग तुमच्यासाठी आहे. म्हणून तुमच्यातील जे उत्तम असेल ते देशासाठी द्या.

– माधुरी कानिटकर, लेफ्टनंट जनरल

पुनिता, पद्मावती आणि माधुरी

त्रितारांकित अधिकाऱ्यांचे पद नौदलात व्हाइस अ‍ॅडमिरल, स्थलसेनेत लेफ्टनंट जनरल तर हवाई दलात एअर मार्शल या नावाने ओळखले जाते. लेफ्टनंट जनरलपद भूषवण्याचा पहिला मान पुनिता अरोरा यांना आहे. त्यानंतर पद्मावती बंडोपाध्याय या पहिल्या महिला एअर मार्शल ठरल्या, तर आता माधुरी कानिटकर या लेफ्टनंट जनरल झाल्या आहेत.