देशभरात करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने १७ मे पर्यंत लॉकडाउन वाढवलेलं आहे. याचसोबत इतर राज्यात अडकलेल्या परप्रांतीय कामगारांसाठीही रेल्वे विभागाने विशेष श्रमिक एक्स्प्रेस गाड्यांची सोय केलेली आहे. मात्र देशाच्या काही भागात परप्रांतीय कामगारांचा अजुनही उद्रेक पहायला मिळतो आहे. गुजरातच्या सूरत जिल्ह्यातील मोरा गावात आज परप्रांतीय मजूरांनी पुन्हा एकदा गर्दी करत आपल्या गावी परत जाण्याची मागणी केली. पीटीआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.
पोलीस ठाण्यात जमलेल्या या कामगारांनी दगडफेक करत परिसरातील वाहनांची नासधुसही केली. अखेरील पोलिसांनी तात्काळ अतिरीक्त कुमक मागवत १०० कामगारांना ताब्यात घेतलं आहे. जमलेल्या कामगारांपैकी बहुतांश कामगार उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा या राज्यांमधले होते. जिल्हा प्रशासनाने आमची घरी जाण्याची सोय करावी अशी मागणी हे कामगार करत होते. देशात लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर सूरतमध्ये अनेकदा परप्रांतीय कामगारांचा उद्रेक झालेला पहायला मिळत आहे. गुजरातमधील स्थानिक काँग्रेस नेत्यांनी या मुद्द्यावरुन राज्य व केंद्रातील भाजप सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
गुजरात में श्रमिक अपने घर जाना चाहते हैं, सरकार 45 दिन के बाद भी कोई सही हल नहीं निकाल रही है,या तो उद्योगपति मित्रो के दबाव में जानबूझकर उनको घर नही जाने दिया जाता,गुजरात के कही शहरों के श्रमिकों और पुलिस का टकराव @narendramodi @vijayrupanibjp सरकार की नाकामी का परिणाम है https://t.co/wX89JtLCi3
— Amit Chavda (@AmitChavdaINC) May 9, 2020
रोजगार व कामधंद्यासाठी इतर राज्यात गेलेल्या कामगारांना आपल्या घरी परतण्यासाठी रेल्वेने विशेष सोय केली आहे. मात्र ज्या कामगारांकडे रेल्वेच्या तिकीटाचे पैसे नाहीत, त्यांची चांगलीच कुचंबणा होताना दिसत आहे. काही कामगारांनी तर शेकडो किलोमीटर पायी चालत जात आपलं गाव गाठण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे परप्रांतीय मजुरांचा प्रश्न हाताळण्यात केंद्र सरकारला पूर्णपणे यश आलेलं नसल्याचा आरोप विरोधीपक्ष करत आहेत.