देशभरामध्ये २०१९ लोकसभा निवडणुकांचे वातावरण चांगलेच तापू लागले आहे. एकीकडे पंतप्रधान मोदी प्रचारसभांमध्ये सरकारने केलेल्या कामांचा पाढा वाचून दाखवत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे मोदी सरकारच्या अपयशावर टीका करताना दिसत आहेत. दोन्ही पक्षांच्या समर्थकांकडून सोशल नेटवर्किंगवर आत्तापासूनच आकडेवारीचे युद्ध सुरु झाल्याचे चित्र दिसत आहे. सरकारमधील अनेक मंत्री आपल्या भाषणांमधून काँग्रेसवर टीका करण्याबरोबरच आपल्या कामांचा हिशेब मांडताना दिसत आहेत. यापैकीच एक महत्वाचे नाव म्हणजे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग आणि जहाजबांधणी व बंदर विकास मंत्री नितीन गडकरी. मोदी सत्तेत आल्यापासून रस्ते आणि जलवाहतूक मंत्रालयाची जबाबदारी संभाळणारे गडकरी हे मोदींच्या मंत्रिमंडळातील सर्वात प्रभावशाली मंत्री असल्याचे ‘लोकसत्ता ऑनलाइन’च्या वाचकांनी एका सर्वेक्षणात म्हटले आहे.

‘लोकसत्ता ऑनलाइन’ने मोदी सरकारची कामगिरीसंदर्भात वाचकांना काय वाटते हे जाणून घेण्यासाठी एक ऑनलाइन सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणामध्ये पंतप्रधान म्हणून मोदींच्या कामापासून ते सरकारच्या अपयशापर्यंत आणि राहुल गांधीपासून ते मोदींच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांपर्यंत अनेक प्रश्न वाचकांना विचारण्यात आले. या सर्वेक्षणामध्ये ७ हजार ७७७ वाचकांनी आपले मत मांडले. सर्वेक्षणामध्ये विचारण्यात आलेल्या मोदींच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांसंदर्भातील एका प्रश्नाला उत्तर देताना वाचकांनी नितीन गडकरी हे सध्याच्या केंद्रीय मंत्रीमंडळातील सर्वात प्रभावी मंत्री असल्याचे म्हटले आहे.

‘मोदी सरकारमधील सर्वात प्रभावी मंत्री कोण?, असा प्रश्न या सर्वेक्षणामध्ये वाचकांना विचारण्यात आला. या प्रश्नाला नितीन गडकरी, अरुण जेटली,सुषमा स्वराज आणि सुरेश प्रभू असे चार पर्याय देण्यात आले होते. यापैकी ६ हजार १०९ वाचकांनी नितीन गडकरी हे सर्वात प्रभावी मंत्री असल्याचे मत नोंदवले. ही आकडेवारी मत मांडणाऱ्या एकूण वाचक संख्येच्या ७८.६ टक्के इतकी आहे. वाचकांनी गडकरींना दिलेला हा कौल म्हणजे रस्ते बांधणीचा वेग, रस्ते बांधणीसंदर्भात करण्यात येणारे वेगवेगळे प्रयोग, स्वच्छ प्रतिमा, वेळोवेळी वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून सरकारची भूमिका समान्यांपर्यंत पोहचवण्याचा गडकरींचा प्रयत्न या सर्वांचा हा परिणाम असल्याचे म्हणता येईल.

नक्की वाचा >> मराठी वाचकांचा कौल मोदींच्या पारड्यात; गडकरीबद्दल संभ्रम तर पवारांना नाकारले

गडकीरींनंतर वाचकांनी सर्वात प्रभावी मंत्री म्हणून सुषमा स्वराज यांना पसंती दर्शवली आहे. १०.३ टक्के म्हणजेच ८०३ वाचकांनी सुषमा यांची सर्वात प्रभावी मंत्री म्हणून निवड केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाची धुरा संभाळणाऱ्या सुषमा या आंतरराष्ट्रीय परिषदांमधील भाषणांबरोबरच ट्विटवरसारख्या स्मार्ट माध्यमातून समान्यांना तातडीने मदत करण्यासाठीही लोकप्रिय आहेत. प्रभावी मंत्र्यांच्या या यादीमध्ये अर्थमंत्री अरुण जेटली (६ टक्के (४६३)) मतांसहीत तिसऱ्या स्थानी तर चौथ्या स्थानी माजी रेल्वेमंत्री आणि सध्या नागरी विमान वाहतूक मंत्री असणाऱ्या सुरेश प्रभूंचा (५.२ टक्के (४०२)) समावेश आहे.

नक्की वाचा >> #LoksattaPoll: वाचक म्हणतात, ‘ फिर एक बार मोदी सरकार’

एकीकडे गडकरींना सर्वात प्रभावी मंत्री म्हणून वाचकांनी निवडले असतानाच पंतप्रधान म्हणून गडकरींऐवजी मोदीच योग्य असल्याचेही दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये म्हटले आहे. ‘मोदींपेक्षा नितीन गडकरी हे पंतप्रधान पदासाठी योग्य उमेदवार आहेत, असे वाटते का?’ या प्रश्नाला ५०.६ टक्के म्हणजेच ३ हजार ९३६ जणांनी गडकरी हे मोदींपेक्षा अधिक योग्य उमेदवार वाटत नसल्याचे मत व्यक्त केले आहे.

‘लोकसत्ता ऑनलाइन’ने २० फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारीदरम्यान केलेल्या ऑनलाइन सर्वेक्षणामध्ये वाचकांनी पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेत येईल असा कौल दिला आहे.