भारतीय साहित्यविश्वातील प्रतिष्ठेच्या साहित्य अकादमी पुरस्कार २०१८ ची बुधवारी घोषणा झाली. विविध २४ भाषांतील उत्कृष्ट साहित्यकृतींसाठी दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. यंदा मराठी भाषेतील साहित्यासाठी प्रसिद्ध लेखक म. सु. पाटील यांच्या ‘सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध’ हा समीक्षा ग्रंथाला हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचबरोबर कोकणी भाषेसाठी परेश नरेंद्र कामत तर  ‘भाषा सन्मान’ पुरस्कारासाठी पुण्याच्या लेखिका डॉ. शैलजा बापट यांची निवड झाली आहे. २९ जानेवारी २०१९ रोजी दिल्लीत या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. एक लाख रूपये, ताम्रपत्र आणि शाल असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

डॉ. शैलजा बापट या पुण्याच्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या कार्यकारिणीच्या सदस्य आहेत. त्यांनी ‘ए क्रिटिकल स्टडी ऑफ ब्रह्मसूत्राज’ हा तीन खंडांतील संशोधनपर ग्रंथ लिहिला आहे. तसेच, शुद्ध अद्वैत आणि केवल अद्वैत वेदांतावरही त्यांनी पुस्तके लिहिली आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे त्यांची ‘प्रोफेसर एमिरेट्‌स’ म्हणून निवड करण्यात आली होती.

हिंदी भाषेतील उत्कृष्ट साहित्यकृती म्हणून चित्रा मुद्गल यांच्या ‘पोस्ट बॉक्स नं. २०३ – नाला सोपारा’ या कादंबरीची निवड झाली आहे. तर उर्दू साहित्यासाठी रहमान अब्बास यांच्या ‘रोहजीन’ या कांदबरीला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.

साहित्य अकादमी पुरस्कारांमध्ये यंदा सात कवितासंग्रह, सहा कादंबऱ्या, सहा लघुकथा, तीन समीक्षा आणि दोन निबंध या साहित्यकृतींना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. हिंदी, मराठी, उर्दू, असामी, बंगाली, बोडो, डोंगरी, इंग्रजी, गुजराती, कोंकणी, कन्नड, मैथिली, मल्याळम, नेपाळी, ओडिया, पंजाबी, राजस्थानी, संताली, सिंधी, तामिळ, तेलगु या भाषांमधील साहित्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

Story img Loader