प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीतील राजपथावर आयोजित करण्यात आलेल्या संचलनात महाराष्ट्र आणि तामिळनाडूच्या चित्ररथाला तिसरा क्रमांक विभागून देण्यात आला आहे. महाराष्ट्राने लोकमान्य टिळक यांच्या १६० व्या जयंतीनिमित्त देखावा सादर केला होता. तर तामिळनाडूने करंगट्टम लोकनृत्य सादर केले होते.

चित्ररथ वर्गवारीत एकूण २३ चित्ररथ सहभागी झाले होते त्यापैकी अरुणाचल प्रदेशच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाला, तर त्रिपुराच्या चित्ररथाला दुसरा क्रमांक मिळाला. त्यांनी होजागिरी नृत्यप्रकार सादर केला होता.

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर यांना शैल कर्म नृत्याबद्दल उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. या केंद्राने मध्य प्रदेशच्या दिंडोरी जिल्ह्य़ातील गोंड जमातीचा लोकप्रिय नृत्यप्रकार शैल कर्म सादर केला होता.

मद्रास इंजिनीअर ग्रुप आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) यांना प्रजासत्ताकदिनी सर्वोत्तम संचलन करणारे पथक म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर अरुणाचल प्रदेश आणि कौशल्य विकास मंत्रालय यांनी चित्ररथ वर्गवारीत पहिले पारितोषिक पटकावले आहे.