करोना असतांना देशात म्युकरमायकोसिसचे नवीन संकट आले आहे. देशातील २८ राज्यांमध्ये म्युकरमायकोसिस (ब्लॅक फंगस) चे एकूण २८,२५२ रुग्ण आढळले आहेत. यापैकी ८६ टक्के म्हणजेच २४३७ प्रकरणांमध्ये करोना संक्रमणाचा इतिहास आहे. तसेच १७,६०१ मधुमेह असलेले रुग्ण आहेत. महाराष्ट्रात म्युकरमायकोसिसचे सर्वाधिक ६,३३९ रुग्ण आहेत. त्यानंतर गुजरातमध्ये ५,४८६ प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

आज करोना संदर्भात उच्चस्तरीय मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यामध्ये या बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ.हर्ष वर्धन होते. परराष्ट्रमंत्री मंत्री डॉ. जयशंकर, केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्री हरदीप पुरी, गृह राज्यमंत्री नित्यानंद राय आणि आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे या बैठकीस उपस्थित होते.

हेही वाचा – Mucormycosis: ‘…तर ब्लॅक फंगसवरील उपचारांचा खर्च ३५ हजारांवरून ३५० रुपयांवर येईल’

डॉ. हर्ष वर्धन यांनी करोना परिस्थिती व त्यावर नियंत्रण ठेवण्याच्या प्रयत्नांचा उल्लेख करून सांगितले की, “रिकवरी दर वाढत आहे आणि आज तो ९३.९४ टक्के आहे. आज गेल्या २४ तासांत, गेल्या ६१ दिवसांत सर्वात कमी नवीन रुग्ण आढळले. आज केवळ १,००,६३६ बाधित आढळले. तसेच या २४ तासांत १,७४,३९९ रूग्ण बरे झाले आहेत. देशातील कोविडमधील मृत्यूचे प्रमाण १.२० आहे.

लसीकरणाबाबत डॉ. हर्ष वर्धन म्हणाले, देशातील नागरिकांना २३,२७,८६,४८२ डोस देण्यात आले. १८ तो ४४ वयोगटातील २,८६,१८,५१४ जणांना पहिला डोस देण्यात आला आहे. आजपर्यंत राज्यांकडे १.४ कोटीहून अधिक डोस उपलब्ध आहेत.