जम्मू येथील सुंजवान या ठिकाणी असलेल्या लष्करी तळावर दहशतवाद्यांशी दोन हात करणाऱ्या जवानांचे रोमहर्षक अनुभव सध्या समोर येत आहेत. असाच एक अंगावर शहारे आणणारा अनुभव आहे तो मेजर अभिजित यांनी विचारलेल्या प्रश्नाचा! भारताच्या प्रेमापोटी जवान आपला प्राण पणाला लावतात हे आजवर आपण ऐकून होतो, त्याची उदाहरणेही समोर आली आहेत. तसेच उदाहरण आहे ते मेजर अभिजित यांचे. मेजर अभिजित ४ दिवसांपूर्वी जखमी झाले आणि त्यानंतर त्यांची शुद्ध हरपली. त्यांच्यावर उपचार करण्यास सुरुवात झाली. औषधांना ते प्रतिसाद देत होते मात्र ते बेशुद्ध होते. अखेर आज झालेल्या सर्जरीनंतर ते शुद्धीवर आले आणि शुद्धीवर येताच त्यांचा पहिला प्रश्न होता ‘दहशतवाद्यांचे काय झाले? ‘

आपल्याला काय लागले आहे? किती इजा झाली आहे, आपण चालू फिरू शकतो की नाही.. एखादा अवयव निकामी तर झाला नाही ना? अशा कोणत्याही प्रश्नापेक्षा मेजर अभिजित यांना प्रश्न पडला तो भारताच्या सीमेत घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांचा. दहशतवाद्यांचा खात्मा करणे त्यांच्यासाठी इतर कशाहीपेक्षा महत्त्वाचे ठरले. त्यांनी विचारलेला हा प्रश्न त्यांची देशभक्ती अधोरेखित करणारा आहे. तसेच एका जवानाच्या मनात देशाविषयी काय भावना असतात ते दाखवणाराही ठरला आहे. ‘एएनआय’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

सध्या माझी प्रकृती चांगली आहे, तसेच मी डॉक्टरांशी बोलू शकतो याचे समाधान वाटते आहे. दिवसातून दोनदा फिरायला मिळते आहे म्हणजे माझ्या प्रकृतीत सुधारणा होते आहे असेही मेजर अभिजित यांनी एएनआयला सांगितले आहे. मी बेशुद्ध झाल्यावर म्हणजेच मागच्या तीन चार दिवसात काय घडले ते मला ठाऊक नाही असेही अभिजित यांनी म्हटले आहे. मात्र त्यांनी विचारलेला प्रश्न त्यांच्या आणि देशाच्या प्रत्येक जवानाच्या मनातील देशभक्ती दाखवणारा आहे.

 

Story img Loader