उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथील मदरशात एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी पोलिसांनी मौलवीला अटक केली आहे. पॉस्को कायद्यांतर्गत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील मुख्य अल्पवयीन आरोपीला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.

२१ एप्रिल रोजी दिल्लीच्या गाजीपूर येथून या मुलीचे अपहरण करण्यात आले होते, त्यानंतर रविवारी साहिबाबादमधील एका मदरशात ही मुलगी भेटली होती. मौलवी आणि अल्पवयीन आरोपी बलात्कार करायचे आणि त्यानंतर खोली बंद करुन घ्यायचे असं पीडितेने सांगितलं. त्या बंद खोलीच्या बाजूच्या खोलीमध्ये क्लास सुरू असायचे. मदरशात अन्य काही जणांनीही चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचे पीडितेने सांगितले असून त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. क्लासेस झाल्यावर आराम करण्यासाठी मौलवी या खोलीचा वापर करायचा. गेल्या वर्षीच या मौलवीची नियुक्ती करण्यात आली होती.

दिल्लीतील गाजीपूर पोलीस चौकीतील एका पथकाने या अल्पवयीन मुलीची मदरशातून सुटका केली होती. पोलिसांच्या या कारवाईनंतर अनेक संघटनांनी निदर्शने केली होती. पीडित मुलीची सुटका झाल्यानंतर लोकांनी येथे निदर्शने केली तसेच संबंधीत मदरशा सील करुन तो चालवणाऱ्या मौलवीच्या अटकेची मागणी त्यांनी केली होती. तसंच, आंदोलकांनी दिल्ली-गाझीपूर महामार्ग रोखून धरला होता, अखेर या मौलवीला अटक झाली आहे. पीडित मुलीला सध्या समुपदेशन केंद्रात ठेवण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशातूनही रोज बलात्काराच्या घटना समोर येत आहेत. कथुआप्रकरणात पीडित अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिला एका मंदिरात दडवून तिच्यावर पाशवी सामुहिक बलात्कार करुन तिचा निर्घुण खून करण्यात आला होता. तसाच प्रकार आता गाझीयाबादमधील मदरशात घडल्याचे प्रथम दर्शनी कळते. दरम्यान, देशात वाढत्या अल्पवयीन मुलींवरील बलात्काराच्या घटना वाढल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नुकतेच पोक्सो कायद्यात सुधारणा करीत १२ वर्षांखालील मुलीवर बलात्कार केल्यास फाशीची शिक्षेची तरतुद करण्यात आली आहे.

Story img Loader