पंजाब नॅशनल बँकेला १३५०० कोटी रुपये कर्जाचा गंडा घालणारा आणि बार्बुडातून व अँटिग्वा फरार झालेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याच्यासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी अँटिग्वा फरार झालेल्या चोक्सीला जेरबंद करण्यात यश मिळालं आहे. मेहुल चोक्सीला डोमिनिकामध्ये अटक करण्यात आली आहे. चोक्सीचा ठिकाणा सापडल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) कारवाई करत त्याला बेड्या ठोकल्या.

पंजबा नॅशनल बँकेला मोठा गंडा घालून मेहुल चोक्सी भारतातून फरार झाला होता. त्याला परत आणण्यासाठी भारताकडून प्रयत्न सुरू असून, त्यातच बार्बुडानंतर २३ मे रोजी चोक्सी अँटिग्वातून फरार झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर त्याचा शोध घेतला जात होता. जानेवारी २०१८ पासून तो तेथे राहत होता अशी माहिती कॅरेबियन बेटावरील रॉयल पोलीस दलाने दिली होती. चोक्सी फरार झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनीही बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. दरम्यान, चोक्सी डोमिनिकामध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सीआयडीने कारवाई करत त्याला अटक केली. सध्या तो सीआयडीच्या कोठडीत आहे.

चोक्सीला अटक झाल्यानंतर त्याचे वकील विजय अग्रवाल यांनीही याबद्दलची माहिती दिली. “मी त्यांच्या कुटुंबीयांशी बोललो आहे. चोक्सी सापडल्यामुळे कुटुंबीय आनंदात आहेत आणि चोक्सीच्या ठिकाणाची माहिती मिळाल्यामुळे त्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. डोमिनिकामध्ये कसं घेऊन जाण्यात आलं, याची माहिती घेण्यासाठी चोक्सीशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असं अग्रवाल म्हणाले.

केंद्रीय अन्वेषण शाखेने चोक्सी याच्याविरोधातील आरोपांचा तपास सुरू केलेला असून, औपचारिक व अनौपरचारिक मार्गाने तो बेपत्ता झाल्याच्या बातम्यांची शहानिशाही सुरू केली होती. इंटरपोलनेही त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. चोक्सी हा रविवारी एका मोटारीत दिसला होता, ती मोटार पोलिसांनी तपासात ताब्यात घेऊन चोक्सीबद्दल तपास सुरू केला होता. चोक्सी याने अँटिग्वा व बार्बुडाचे नागरिकत्व घेतले असून, तो दक्षिण भागात गाडी चालवताना दिसला होता. चोक्सी व नीरव मोदी यांनी पंजाब नॅशनल बँकेला १३५०० कोटी रुपयांच्या कर्ज प्रकरणात गंडा घातला होता. चोक्सी जानेवारी २०१८ मध्ये भारतातून पळाला होता.