करोना आणि टाळेबंदीमुळे देशाचा अर्थप्रवास बिकट ठरणार आहे. अमेरिकी मूडीजने भारताचे पतमानांकन खाली खेचतानाच देशाला कमी विकास दर व सरकारला वाढत्या वित्तीय तुटीचा सामना करावा लागेल, असा इशारा दिला आहे.

देशाच्या गुंतवणूकविषयक आवश्यक अशा वातावरणासाठीचे सार्वभौम पतमानांकन मूडीजच्या गुंतवणूक सेवा विभागाने सध्याच्या बीएए२ वरून बीएए३ असे कमी केले आहे. करोना संकटाचे आव्हान पेलण्यासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या योजनांच्या निर्धोक अंमलबजावणीबाबतही मूडीजने शंका उपस्थित केली आहे.

मूडीजने यापूर्वी, नोव्हेंबर २०१७ मध्ये भारताचे पतमानांकन बीएए३वरून बीएए२ असे उंचावले होते. तब्बल १३ वर्षांच्या कालावधीनंतर देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत सुधारणा झाल्याचे मत याद्वारे मांडण्यात आले होते. भारताचा चालू वित्त वर्षांचा विकास दर शून्याखाली राहण्याचा अंदाज अनेक वित्तसंस्था, दलालीपेढय़ा तसेच पतमानांकन संस्थांनी व्यक्त केला आहे. गेल्या वित्त वर्षांत भारताची अर्थप्रगती गेल्या ११ वर्षांच्या सुमार स्थितीतील राहिल्याचे गेल्याच आठवडय़ातील आकडेवारीवरून सिद्ध झाले आहे.

आघाडीच्या वित्तसंस्थांमार्फत दिले जाणाऱ्या गुंतवणूकविषयक पतमानांकनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्व आहे. या गुंतवणूक दर्जानुसार देशात किती व कोणत्या क्षेत्रात विदेशी चलन, प्रकल्पांच्या माध्यमातून गुंतवणूक करायची याबाबतची धोरणे राबविली जात असतात. मूडीजने देशाच्या सार्वभौम पतमानांकनाबरोबरच देशाच्या विदेशी तसे स्थानिक चलनाबाबतचे पतमानांकनही कमी केले आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाने काही दिवसांपूर्वी नोंदविलेल्या तळाची पाश्र्वभूमी त्यामागे असल्याचे मानले जाते.

Story img Loader