केंद्रीय शिक्षण मंडळाच्या दहावी, बारावी परीक्षेतील यशवंत आहेत कुठे?

रितिका चोप्रा /  एक्स्प्रेस वृत्तसेवा

नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेतील गेल्या २० वर्षांतील उच्च गुणवत्ताधारक (टॉपर्स) सध्या कुठे आहेत, असा प्रश्न कुणाला पडला असेल तर त्याचे उत्तर, ‘‘त्यापैकी निम्म्याहून अधिक परदेशात विविध महत्त्वाच्या पदांवर आहेत,’’ असे मिळते.

कोणी न्यू यॉर्कमध्ये कर्करोगतज्ज्ञ आहे, कोणी जगप्रख्यात मॅसेच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये (एमआयटी) पीएचडी फेलो आहे, कोणी हार्वर्ड विद्यापीठात प्राध्यापक आहे, तर कोणी सिंगापूरमध्ये निधी व्यवस्थापक आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक ११ गुणवत्ताधारक ‘गुगल’मध्ये कार्यरत आहेत.

‘सीबीएसई’ आणि ‘सीआयएससीई’ या केंद्रीय शिक्षण मंडळांनी १९९६ ते २०१५ या काळात घेतलेल्या १० वी आणि १२ वीच्या परीक्षांत देशात प्रथम आलेल्या ८६ विद्यार्थीनी आणि विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने केले. त्यातील हे निष्कर्ष आहेत.

निम्म्याहून अधिक उच्च गुणवत्ताधारक सध्या परदेशात वास्तव्य करीत आहेत आणि अमेरिका हे त्यांनी निवडलेले ठिकाण आहे. त्यापैकी बहुतेकजण आयआयटीचे विज्ञान आणि तंत्रज्ञान पदवीधारक आहेत. त्यांच्यापैकी निम्मे गुणवत्ताधारक हे महानगरांबाहेर वाढलेले आहेत. त्यापैकी एक अल्पसंख्यांक समाजातील आहे, परंतु त्यांत दलित आणि आदिवासींमधील एकाचाही समावेश नाही. विशेष म्हणजे गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थीनींना परदेशात जाण्याची संधी कमी मिळते.

प्रत्येक गुणवत्ताधारक ही बुद्धिमत्ता आणि प्रयत्नांची, उत्कृष्ठता आणि यश यांची एक कथा आहे. भारताने १९९०नंतर खुली अर्थव्यवस्था स्वीकारल्यानंतर घडलेल्या पिढय़ांच्या त्या प्रातिनिधिक कथा असल्याचे ‘इंडियन एक्स्प्रेस’ने केलेल्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

निम्मे  परदेशात

* २१ ते ४२ या वयोगटातील निम्म्याहून अधिक गुणवत्ताधारक परदेशात आहेत.

* त्यांच्यापैकी बहुतेक सर्व नोकरी करतात, तर काहीजण उच्च शिक्षण घेत आहेत.

* प्रत्येक चार जणांपैकी तीन जण अमेरिकेत आहेत.

* त्यापैकी अनेकांचे अमेरिकेला प्राधान्य होते. अन्य काही ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, चीन, कॅनडा, बांग्लादेश आणि युएईमध्ये आहेत.

Story img Loader