मुंबईतील २,००० हून अधिक आणि तृणमूलच्या खासदार मिमी चक्रवर्ती यांच्यासह कोलकातामधील सुमारे ५०० लोक गेल्या काही आठवड्यांत बनावट कोविड लसीकरण मोहिमेला बळी पडले. या दोन्ही प्रकरणात, केंद्र सरकारच्या लसीकरण मोहिमेसाठी असललेल्या आयटी प्लॅटफॉर्म को-विन कडून कोणताही संदेश न मिळाल्यामुळ् लाभार्थ्यांनी संशय व्यक्त केला. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. या दोन्ही प्रकरणांचा तपास सुरू आहे असून आणि लसीकरणात लोकांना लसीद्वारे काय देण्यात आलं आणि ते हानिकारक होते की नाही याची अद्याप माहिती समोर आलेली नाही.

बनावट लसीकरणानंतर बुधवारी पहिल्यांदा अधिकृतपणे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यावर भाष्य केले आहे. त्यांनी सांगितले की हा प्रकार एक प्रकारे विकृती आहे. जो केवळ केंद्रीय आयटी प्लॅटफॉर्म को-विनमुळेच पकडली जाऊ शकतो. “आम्ही ३३ कोटी लोकांचे लसीकरण केल्यामुळे को-विनचा मेसेज न मिळाल्यानंतर बनावट लसीकरणाबद्दल आता सहज माहिती मिळू शकत आहे. अशा घोटाळ्यांविरूद्ध कारवाई करण्यासाठी राज्यांशी आम्ही संपर्क साधत आहोत,” असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव्ह अग्रवाल यांनी सांगितले. मंगळवारी मुंबई आणि कोलकातामधील लसीकरण घोटाळ्याबद्दल विचारण्यात आल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.

लव अग्रवाल यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन गोष्टींवर सर्वात जास्त लक्ष ठेवले आहे, लसीकरणानंतर लोकांच्या आरोग्यावर कोणते परिणाम होत आहेत का आणि सर्वांना लसीचा दुसरा डोस मिळत आहे का? त्यानंतर लव अग्रवाल यांनी कोविन पोर्टल कशाप्रकारे सर्व गोष्टींची तपासणी करते हे सांगितले तसेच लोकांना बोगस लसीकरणापासून लोकांना सावध करण्यासाठी सतर्क राहण्यास सांगते.

लसीकरण घोटाळा: मुंबईत २००० हून जास्त लोकांची फसवणूक; ठाकरे सरकारची हायकोर्टात माहिती

मुंबईत काय घडलं

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयामार्फत लसीकरण शिबीर आयोजित करू, असे सांगत मुख्य आरोपी राजेश पांडे आणि त्याच्या साथीदारांनी शहरात नऊ ठिकाणी बनावट शिबिरे घेतली. शिबीर आटोपल्यानंतर रहिवाशांच्या हाती पडलेल्या प्रमाणपत्रांवर अन्य रुग्णालयं, वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या संस्थांची नावे होती. रहिवाशांच्या नावांसह अन्य तपशीलही चुकीचे होते. तसेच लसीकरणाचा कोणताही मेसेज त्यांना आला नव्हता.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रहिवाशांनी कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्याआधारे गुन्हा नोंदवून पोलिसांनी आतापर्यंत आरोपींना अटक केली. त्यानंतर मुंबईतील अनेक ठिकाणी अशाच प्रकारे लसीकरण घोटाळा झाल्याचे उघड झाले. प्राथमिक माहितीनुसार, रहिवाशांना खारट पाणी दिले गेले. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी सांगितले की सरकार जे या घोटाळ्यात बळी पडले आहे अशा प्रत्येकाची चाचणी केली जाईल आणि नंतर या लोकांना आयसीएमआरच्या सूचनेनुसार कोव्हिशिल्ड देण्यात येईल.

कोलकात्यात काय घडलं

देबंजन देब या २८ वर्षीय व्यक्तीने कोलकाता महानगरपालिका अधिकारी म्हणून दोन लसीकरण शिबिरांचे आयोजन केले. यातील एका लसीकरण शिबिरात तृणमूलच्या खासदार मिमी चक्रवर्ती यांना आमंत्रित केले होते. मिमी चक्रवर्ती यांनी लस घेतल्यानंतर मेसेज न मिळाल्याने त्यांनी याबाबत चौकशी केली. त्यानंतर संपूर्ण बनावट लसीकरण घोटाळा समोर आला. या लोकांना लसीच्या नावाखाली काय दिले गेले हे अद्याप समजू शकलेले नाही. तपासासाठी एसआयटी स्थापन केली गेली आहे आणि देबंजन देब यांच्यावर खुनाचा आरोप लावण्यात आला आहे. लस घेतलेल्या लोकांना पुन्हा एकदा डोस घेणे आवश्यक आहे की नाही हे तपासण्यासाठी तज्ञ समिती देखील स्थापन केली आहे.