केंद्र सरकारने केलेले नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांच्या नेतृत्वाखाली राजधानी दिल्लीच्याच्या सीमेवर गेल्या ११ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. शेतकरी नेते आणि केंद्र सरकार यांच्यातील चर्चेच्या अनेक फेऱ्या निष्फळ ठरल्या आहेत. नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी संघटना ठाम आहेत. शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या उद्या-मंगळवारच्या ‘भारत बंद’ला काँग्रेससह विरोधकांनी रविवारी पाठिंबा जाहीर केला. विरोधकही मैदानात उतरल्याने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बळ मिळाले आहे. एकीकडे शेतकऱ्यांचा हा लढा सुरु असतानाच दुसरीकडे शेतकऱ्यांना मदत करणारे हातही पुढे येत आहे. दिल्लीतील २५ मुस्लीम व्यक्तींनी एक गट निर्माण केला असून ते आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांसाठी लंगर म्हणजेच जेवणाची सोय करु देत आहे.
मुस्लीम फेड्रेशन ऑफ पंजाब या संस्थेचे हे सदस्य आहेत. फारुकी मुकबीन हा तरुण या २५ जणांच्या टीमचं नेतृत्व करतोय. सर्वांचे पोट भरणाऱ्या शेतकऱ्याचे पोट भरण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत, असं फारुकी सांगतो. आंदोलन सुरु असेपर्यंत आठवड्यातील सातही दिवस २४ तास लंगरची सोय उपलब्ध असणार आहे असं फारुकीने पीटीआयशी बोलताना सांगितलं. शेतकरी आपल्यासाठी एवढं काय काय करतात. आज आपण त्याची परतफेड करण्याची वेळ आहे, अशा भावनाही फारुकीने व्यक्त केली.
आणखी वाचा- “ही तर देशी ईस्ट इंडिया कंपनीची मुहूर्तमेढ आहे”
शेतकऱ्यांची काळजी घेणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आमचा २५ स्वयंसेवकांचा गट आहे. लंगर दिवस-रात्र सुरु रहावा म्हणून आम्ही काम करत आहोत, असंही फारुकी म्हणाला. प्रामुख्याने हरयाणा आणि उत्तर प्रदेशमधून दिल्लीत येणाऱ्या मार्गांवर राजधानीच्या सीमांवरच शेतकऱ्यांनी हे आंदोलन सुरु केला आहे. या आंदोलनचा आज (सोमवार) १२ वा दिवस आहे.
भारत बंदची हाक
केंद्र सरकार नवे कृषी कायदे रद्द करण्याची मागणी मान्य करीत नसल्याने शेतकरी संघटनांनी ८ डिसेंबरला ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, डावे पक्ष आणि दहा प्रमुख कामगार संघटनांनीही शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ला पाठिंबा दिला होता. आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तेलंगण राष्ट्र समिती, ‘आप’, शिवसेना आदी पक्षांनीही ‘भारत बंद’ला पाठिंबा जाहीर केला आहे. शेतकऱ्यांना पाठिंबा जाहीर करणारे संयुक्त निवेदन विरोधकांनी काढले आहे.