जागतिक आरोग्य संघटनेचे मत
भारतात गेल्या ऑक्टोबर महिन्यात सापडलेला करोनाचा बी.१.६१७ हा उत्परिवर्तीत विषाणू वेगाने पसरत असून त्यामुळे जगभरातच जोखीम निर्माण झाली आहे. वेगाने पसरण्याच्या क्षमतेमुळे हे उत्परिवर्तन जागतिक चिंतेचा विषय असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या तंत्रज्ञ प्रमुख मारिया व्हॅन केरखोव यांनी सांगितले की, बी.१.६१७ हा मूळ विषाणूपेक्षा वेगाने पसरणारा असून तो घातक असल्याची माहिती मिळाली आहे. या विषाणूचा मूळ प्रकार ऑक्टोबर २०२० मध्ये सापडला होता पण नंतर तोच विषाणू डिसेंबरमध्ये काही उत्परिवर्तनांसह सापडला होता. भारताली उत्परिवर्तनाचा हा विषाणू १९ देशांत पसरला असून अनेक देशांनी भारतात जाण्यास प्रवासबंदी लागू केली आहे.
केरखोव यांनी सांगितले की, या विषाणू उपप्रकाराबाबत तसेच इतर तीन प्रकारांबाबत माहिती घेतली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रॉस अधनोम घेब्रेसस यांनी सांगितले की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन फाउंडेशन या संस्थेच्या वतीने ‘टुगेदर फॉर इंडिया’ ही मोहीम राबवण्यात येत आहे. त्यात प्राणवायू, औषधे, आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा उपकरणे यासाठी निधी संकलन करण्यात येत आहे.