राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे राज्याच्या राजकारणातील दोन मोठे नेते आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले होते. दोघांकडूनही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले होते. शरद पवार यांनी तर वंचित आघाडी ही भाजपाच्या मदतीसाठीत असल्याचा आरोप केला होता. तर प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांनी मला घाबरुनच माढ्यातून माघार घेतली असा दावा केला होता. एकमेकांविरोधात मैदानात दंड थोपटणारे हे नेते आज मात्र मैदानात एकत्र सोबत उतरल्याचं चित्र पहायला मिळालं.

मुंबईत भाजपाचे माजी नेते यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली गांधी शांतता मार्च यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. या शांतात मार्चसाठी अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आल्याचं चित्र पहायला मिळालं. याशिवाय नवाब मलिक, पृथ्वीराज चव्हाणदेखील उपस्थित होते. शरद पवार यांनी यावेळी बोलताना महात्मा गांधी यांच्या विचारावर चालण्याची गरज असून नव्या कायद्यांमुळे देशाच्या एकतेला धोका असल्याची भीती व्यक्त केली.

ही यात्रा मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’ इथून ही यात्रा सुरू होणार असून अनेक राज्यांमधून मार्गक्रमण करीत ती पुढे दिल्ली येथे संपणार आहे. सरकारने संसदेत एनआरसी रद्द करण्याची घोषणा करावी, अशी मागणी या यात्रेद्वारे सरकारकडे केली जाणार आहे. महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा येथून जात ३० जानेवारी रोजी महात्मा गांधींच्या स्मृतीदिनी त्यांच्या स्मृतीस्थळी राजघाटावर ही यात्रा संपणार आहे.

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले ?
“वयाच्या ८० व्या वर्षी यशवंत सिन्हा यांनी काढलेल्या यात्रेचं कौतुक केलं पाहिजे. ही लढाई मोठी आहे पण सरकार सहजासहजी ऐकेलं असं मला वाटतं नाही. सरकारने सहा महिन्यांपूर्वीच डिटेन्शन कँप बांधले आहेत. हे एका प्रकारे युद्ध असून ते शांततेनं लढावं लागेल. हा राजकीय लढा असल्याने तो राजकीय मंचावरच लढला पाहिजे. आपण संविधानासाठी तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या अजेंड्यासाठी लढत आहे”.

आणखी वाचा – CAA विरोधात आक्रोश, मोदींनी रद्द केला आसाम दौरा; एका महिन्यात दुसऱ्यांदा ओढवली नामुष्की

शरद पवारांनी काय म्हटलं ?
“आज देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे समाजातील एक मोठा वर्ग नाराज आहे. त्यांना रस्ता दाखवण्यासाठी महात्मा गांधींचा सत्याग्रहाचा मार्गच योग्य आहे. ही जबाबदारी यशवंत सिन्हा यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. समाजात जागृती करण्यासाठी एकता निर्णाण करणं गरजेचं आहे. नवी पिढी रस्त्यावर शांततेने येऊ पाहत आहे, मात्र, त्यांना येऊ दिले जात नाही आहे. जेएनयूत जे काही झालं त्याचा परिणाम आपण ठिकठिकाणी पाहत आहोत. त्यामुळेच यामध्ये जर बदल घडवून आणायचा असेल तर आपल्याला महात्मा गांधींचा मार्ग अवलंबने गरजेचे आहे”.