करोना व्हायरसच्या उपचारानंतर रुग्णाला दिल्या जाणाऱ्या डिस्चार्जशी निगडीत नव्या गाईडलाइन्स सरकारनं जारी केल्या आहेत. नव्या गाईडलाइन्सनुसार मध्यम लक्षणं असलेले रुग्ण उपचारानंतर बरे झाल्यावर त्यांना चाचणीशिवाय डिस्चार्ज देण्यात येणार आहे. परंतु त्यांना सलग तीन दिवस ताप किंवा त्यांना ऑक्सिजनची गरज भासू नये, अशी अटही ठेवण्यात आली आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर आता त्यांना १४ ऐवजी ७ दिवस होम आयसोलेशनमध्ये राहावं लागणार आहे.
सौम्य आणि सुरूवातीची लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी
आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार आता कोविड केअर फॅसिलिटीमध्ये दाखल करण्यात आलेल्या सौम्य आणि सुरूवातीची लक्षणं असलेल्या रुग्णांचं नियमित तापमान तपासलं जाणार आहे. तसंच पल्स मॉनिटरींगही करण्यात येईल. तसंच त्यांना सलग तीन दिवस ताप नसेल आणि उपचार घेऊन १० दिवसांचा कालावधी लोटला असेल तेव्हाच त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल. तसंच डिस्चार्जपूर्वी चाचणीची केली जाणार नाही आणि त्यांना ७ दिवस होम आयसोलेशमध्ये राहावं लागणार आहे.
कोविड केअर फॅसिलिटी सेंटरमधून डिस्चार्ज देण्यापूर्वी जर कोणत्याही रुग्णाचं ऑक्सिजन सॅच्युरेशन ९५ टक्यांपेक्षा खाली आलं तर त्याला डेडिकेटेड कोविड केअरमध्ये दाखल करण्यात येईल. तसंच डिस्चार्ज दिल्यानंतर रुग्णाला पुन्हा ताप, कफ किंवा श्वास घेण्यास समस्या निर्माण झाल्यास त्यांना कोविड केअर फॅसिलिटी, राज्याचा मदत क्रमांक किंवा १०७५ या क्रमांकावर संपर्क साधावा लागणार आहे.
डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमधील रुग्णांसाठी
१. लक्षण ३ दिवसांत नाहीसे होतील आणि ऑक्सिजन सॅच्युरेशन लेव्हल ९५ टक्के असेल
ज्या केसेस सामान्य आहेत त्यांचे दररोज शरीरारचं तापमान तपासलं जाणार आहे आणि ऑक्सिजन सॅच्युरेशनही पाहिलं जाईल. जग रुग्णांचा ताप तीन दिवसांच्या आत गेला तसंच ऑक्सिजन सॅच्युरेशन लेवल पुढील ४ दिवस ९५ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर त्यांना लक्षण दिसल्यानंतर १० दिवसांनी रुग्णालयातून सोडण्यात येईल. जर त्यांचा ताप औषधांशिवाय कमी झाला, श्वास घेण्यास कोणतीही समस्या येत नसेल आणि बाहेरून ऑक्सिजन देण्याची गरज भासत नसेल तर त्यांना ७ दिवसांसाठी होम आयसोलेशनवर राहावं लागेल.
२. ज्यांना ऑक्सिजन दिला आहे आणि ३ दिवसांनंतरही ताप आहे
अशा लोकांना तेव्हाच डिस्चार्ज देण्यात येईल जेव्हा त्यांच्यात करोनाचं कोणतंही लक्षण दिसणार नाही. तसंच त्यांच्या सलग तीन दिवस ऑक्सिजन सॅच्युरेशन कायम राहिल्यानंतरच त्यांना सोडण्यात येणार आहे.
गंभीररित्या आजारी रुग्ण
गंभीररित्या आजारी रुग्णांमधील करोनाची लक्षणं पूर्णपणे गेल्यानंतरच त्यांना रुग्णालयातून सोडण्यात येणार आहे. तसंत लक्षण पूर्णपणे नाहीशी झाल्यानंतर त्यांची RT-PCR टेस्ट करण्यात येईल. ती निगेटिव्ह आल्यास त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल.