उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना भगवान श्री कृष्ण आणि भगवान श्री राम यांच्यांशी केली आहे. रविवारी हरिद्वारमध्ये नेत्र कुंभाची सुरुवात करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री रावत यांनी पंतप्रधान मोदींचं तोंड भरुन कौतुक केलं. याचवेळी त्यांनी मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची प्रतिमा उंचावली असल्याचे सांगितलं. आज अनेक मोठ्या मोठ्या देशांचे राष्ट्राध्यक्ष मोदींना भेटण्यासाठी रांगेत उभे असतात असंही रावत यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे. ज्या पद्धतीने त्रेता आणि द्वापर युगामध्ये भगवान राम आणि भगवान कृष्ण यांनी अवतार घेतला होता त्याचप्रकारे येणाऱ्या कालावधीमध्ये पंतप्रधान मोदींना येणाऱ्या काळामध्ये लक्षात ठेवेल, असं रावत यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे.

नक्की वाचा >> “पंतप्रधान मोदी हे भगवान शंकराचा अवतार असल्याने त्यांनीच देशाला करोनापासून वाचवलं”

मुख्यमंत्री रावत हे हरिद्वारमधील कुंभ मेळ्यासंदर्भातील कार्यक्रमात भाषण देताना मोदींवर स्तुतीसुमनं उधळत होते. एक काळ असा होता की देशाचे पंतप्रधान परदेशात जायचे तेव्हा त्यांना तिकडे कुणी विचारायचही नाही. आज मात्र भारताची परिस्थिती आणि गोष्टींकडे पाहण्याचा जगाचा दृष्टीकोन बदलला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा परदेशात जातात तेव्हा इतर देशांचे राष्ट्रध्यक्ष त्यांची भेट घेण्यासाठी रांगेत उभे राहतात, असं रावत म्हणाले. सध्या रावत हे पौडी लोकसभा मतदारसंघामधून खासदार आहेत. जनतेचं काम करणारे लोकप्रितिनिधी म्हणून मोदींनी जनतेवर कधीही न पुसता येणारी छाप सोडल्याचं प्रशस्तीपत्रकही रावत यांनी मोदींना दिला. मोदींच्या कामाकडे पाहूनच मोदी है तो मुमकिन है असं म्हटलं जातं, असंही रावत म्हणाले.

ज्याप्रमाणे द्वापर युगामध्ये भगवान श्री राम आणि त्रेता युगामध्ये भगवान श्री कृष्णाने आपल्या कर्मांमुळे समाजामध्ये मान सन्मान मिळवला आणि देवत्व प्राप्त केलं त्याच प्रकारे येण्याऱ्या कालावधीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देवाप्रमाणे पूजा केली जाईल, असंही आपल्या भाषणात रावत म्हणाले. मागील आठवड्यामध्येच तीरथ सिंह रावत यांनी उत्तराखंडचे दहावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्रिवेंद्र सिंह रावत यांनी सोमवारी (आठ मार्च रोजी) राजीनामा दिल्यानंतर मंगळवारी झालेल्या भाजपाच्या बैठकीत तीरथ सिंह रावत यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेण्यात आला. उत्तराखंडमध्ये राजकीय संकट निर्माण झालं होतं. त्रिवेंद्र सिंह रावत यांच्यावर पक्ष नाराज असल्याची चर्चा सुरू होती. भाजपा आमदारांनी रावत यांच्याबद्दल पक्षाकडे नाराजीचा सूर लावत तक्रार केली होती. याच पार्श्वभूमीवर त्रिवेंद्र सिंह रावत यांच्याजागी तीरथ सींह रावत यांची वर्णी लागलीय.