विशाखापट्टनम येथे दुसऱ्यांदा वायू गळती झाल्याच्या बातम्या खऱ्या नाहीत. तज्ज्ञ अधिकारी घटनास्थळी असून त्यांनी वायुगळती बंद करण्यात यश मिळवले आहे, अशी माहिती राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाचे महासंचालक एस.एन. प्रधान यांनी दिली.
त्यांनी सांगितले की, प्रकल्पाच्या ठिकाणी काही प्रमाणात वाफा दिसत होत्या. तो तांत्रिक प्रश्न असून घाबरण्याचे कारण नाही. या प्रकल्पात दुसऱ्यांदा वायू गळती झाल्याच्या बातम्या आल्या आहेत पण त्या अफवा आहेत, त्यात तथ्य नाही.
तत्पूर्वी केंद्रीय गृह मंत्रालयाने असे म्हटले होते की, किरकोळ तांत्रिक चुकीमुळे आंध्र प्रदेशातील विशाखापट्टनम येथे रासायनिक कारखान्यातून वायुगळती झाली. ती नंतर नियंत्रणात आली असून वायू शमवण्याची प्रक्रियाही पार पडली आहे.
‘एलजी पॉलिमर्स’ला पन्नास कोटींचा दंड
स्टायरिन वायूची गळती झाल्याच्या प्रकरणी विशाखापट्टनम येथील एलजी पॉलिमर्स इंडिया कंपनीला राष्ट्रीय हरित लवादाने पन्नास कोटी रुपये दंड केला असून केंद्र सरकार व इतरांचा प्रतिसाद मागवला आहे. नियम व वैधानिक तरतुदींची पायमल्ली झाल्याचे सकृतदर्शनी दिसून आले आहे, असे लवादाने म्हटले आहे. राष्ट्रीय हरित लवादाचे अध्यक्ष निवृत्त न्या. आदर्शकुमार गोयल यांनी गुरुवारच्या वायुगळतीची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यांची चौकशी समिती नेमली आहे. चौकशी समिती १८ मे पूर्वी आपला अहवाल सादर करणार आहे. कंपनीने आता दंडापोटी ५० कोटी रुपये जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे जमा करावेत व त्यापुढे हरित लवादाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे असे सांगण्यात आले .