दिल्लीमधील सार्वजनिक बलात्कार प्रकरणातील आरोपींनी शेवटपर्यंत फाशी वाचवण्यासाठी धडपड सुरु ठेवली होती. त्यामुळे फाशीला अवघे काही तास उरलेले असताना आरोपींच्या वकिलांनी कोर्टात फाशी टाळण्यासाठी याचिका दाखल केली होती. मात्र या याचिकेत कोणतेही ठोस मुद्दे नाहीत हे स्पष्ट करत कोर्टाने याचिका फेटाळून लावली आहे. ज्यामुळे निर्भयाच्या दोषींना फाशी होणार हे आता निश्चित झालं आहे. पुढील काही वेळातच या आरोपींना फासावर लटकवलं जाणार आहे. एकीकडे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर रात्रभर नाट्यमय घडामोडी सुरु होत्या तर दुसरीकडे तरुंगामध्ये या चौघांच्या फाशीची तयारी करण्यात येत होती. न्यायालयाने याचिका फेटळल्याने आपल्याला फासावर लटकवणार हे समजल्यानंतर चारही आरोपी आपल्या कोठडीमध्ये रडू लागले. गुरुवारी संध्याकाळपासूनच हे चारही जण अस्वस्थ होते. या चौघांना फाशी दिल्या जाणाऱ्या जागेपासूनच्या जवळ असणाऱ्या कोठडीमध्ये ठेवण्यात आलं आहे.

मुकेश सिंग, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि अक्षय कुमार सिंग चार आरोपींपकी केवळ मुकेश आणि विनयनेच रात्री जेवण घेतलं. मात्र पवन आणि अक्षयने जेवणास नकार दिल्याचं तुरुंग प्रशासनाने म्हटलं आहे. एकीकडे आरोपींच्या वकीलांना आरोपींना कुटुंबियांना भेटू दिलं जात नाही असा आरोप केला असतानाच रात्री उशीरा आरोपींच्या कुटुंबियांनी आरोपींची भेट घेतली.

आणखी वाचा- निर्भया प्रकरण: आत्तापर्यंत तीन वेळा टळली होती दोषींची फाशी

चारही आरोपींना तिहार तुरुंगामधील तुरुंग क्रमांक तीनमध्ये ठेवण्यात आलं आहे. एक आरोपी वॉर्ड क्रमांक एकमध्ये आहे दुसरा वॉर्ड क्रमांक सातमध्ये तर बाकी दोघे आरोपी वॉर्ड क्रमांक आठमध्ये आहे. या तिन्ही कोठड्या फाशी दिली जाते तेथून काही अंतरावरच आहेत.

चारही आरोपी शेवटच्या क्षणी आत्महत्येचा प्रयत्न करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी १५ लोकांची टीम तयार करण्यात आली आहे. हे १५ लोकं आरोपींवर नजर ठेऊन आहेत.

आणखी वाचा- याकूब मेमनच्या केसनंतर पाच वर्षांनी निर्भया प्रकरणात रात्री उघडले सुप्रीम कोर्टाचे दरवाजे

फाशी देण्यात आल्यानंतर चारही आरोपींचे मृतदेह दीनदयाल रुग्णालयामध्ये शवविच्छेदानासाठी पाठवले जातील. शुक्रवारी सकाळी आठ वाजता त्यांचे शवविच्छेदन होईल. त्यानंतर कुटुंबाकडे त्यांचे मृतदेह सुपूर्द केले जातील. मात्र कुटुंबाने मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला तर तुरुंग प्रशासनाच्या नियमांनुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.

गुरुवारी तुरुंग प्रशासनाने आरोपींकडे तुमची शेवटची इच्छा काय आहे यासंदर्भात विचारणा करण्यात आली. त्यावेळी चौघांनाही ‘काही नाही’ एवढेच उत्तर दिल्याचे समजते. या चौघांनाही शेवटची इच्छा नसल्याचं सांगितलं. या आरोपींनी मागील सात वर्षांमध्ये तुरुंगामध्ये काम करुन कमावलेला पैसा त्यांच्या कुटुंबाला दिला जाणार असल्याचे तुरुंग प्रशासनाने याआधीच स्पष्ट केलं आहे.