केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कुंभ मेळा तसेच मुस्लिमांसाठी पवित्र असणाऱ्या रमजानच्या महिन्यामध्ये करोना नियमांचे पालन केलं जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे सांगत सध्या ज्या वेगाने करोना विषाणूचा प्रसार होत आहे ही गोष्ट अडचणीची ठरु शकते असं मतही शाह यांनी व्यक्त केलं आहे. तसेच सरकारने करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी योग्य निर्णय घेतल्याचंही शाह यांनी सांगितलं.

“कुंभ असो किंवा रमजान असो कुठेही करोनासंदर्भातील नियम पाळल्याचं दिसून आलं नाही. असं वागणं चुकीचं आहे. त्यामुळेच आम्ही आवाहन केलं आणि आता कुंभ प्रातिनिधिक पद्धतीने साजरा केला जातोय,” असं शाह यांनी टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं.

यावेळी बोलताना शाह यांनी दुसऱ्या करोना लाटेसंदर्भातील निर्णय घेण्यात केंद्र सरकारने उशीर केल्याचा आरोप फेटाळू लावला. केंद्राने उशीरा निर्णय घेतल्याने ऑक्सिजन आणि औषधांचा तुटवडा जाणवला असं आपल्याला वाटत नसल्याचं शाह म्हणाले. शाह यांनी जागतिक स्तरावरील उदाहरण देत, “जिथे जिथे करोनाची दुसरी किंवा तिसरी लाट आलीय ती आधी आधीच्या लाटेपेक्षा नक्कीच मोठी असल्याचं दिसून आलं आहे. नवीन प्रकारचा करोना विषाणू आधीपेक्षा वेगाने पसरत आहे. तो कमी घातक असला तरी त्याच्या प्रसाराचा वेग फार आहे,” असं शाह म्हणाले.

नवीन प्रकारच्या विषाणूचा अभ्यास शास्त्रज्ञ करत असून त्यांना लवकरच यासंदर्भात यश येईल असा विश्वास शाह यांनी व्यक्त केलं. “सध्या ज्या वेगाने विषाणूचा प्रसार होत आहे त्यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात. मात्र या दुसऱ्या लाटेविरुद्धातील लढाई आपण जिंकू असा मला पूर्ण विश्वास आहे,” असंही शाह यांनी सांगितलं.

त्याचप्रमाणे परदेशातून मोठ्या संख्येने प्रवासी येणाऱ्या राज्यांमध्ये करोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाल्याचं मतही शाह यांनी व्यक्त केलं. “पंजाब, गुजरात., महाराष्ट्र, केरळ, दिल्ली… या सर्व राज्यांमध्ये मोठ्या संख्येने आंतरराष्ट्रीय प्रवास येत असतात,” असं वाढत्या करोना रुग्णसंख्येसंदर्भात बोलताना शाह म्हणाले.