ब्रिटनमध्ये सापडलेल्या संसर्गजन्य करोना विषाणूचा नवा प्रकार जीवघेणा असल्याचे कुठलेही पुरावे नाहीत, अशी दिलासादायक माहिती अमेरिकेतील भारतीय वंशाचे महाशल्यचिकित्सक विवेक मूर्ती यांनी दिली आहे. अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष जो बायडेन यांनी याच महिन्यात महाशल्यचिकित्सक पदी मूर्ती यांची नियुक्ती जाहीर केली आहे.

सर्वात घातक किंवा जीवघेणा असल्याचे पुरावे नाहीत :
“ब्रिटनमध्ये करोना विषाणूचा नवा प्रकार सापडला असून तो जास्त संसर्गजन्य आहे. जास्त संसर्गजन्य असला तरी विषाणूचा हा प्रकार सर्वात घातक किंवा जीवघेणा असल्याचे पुरावे नाहीत”, असे मूर्ती यांनी एनबीसी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. “करोनावर आता लसी उपलब्ध आहेत. त्या लसी नवीन प्रकारच्या विषाणूवर परिणामकारक ठरणार नाहीत असे मानण्याचे कुठलेही कारण नाही”, असंही मूर्ती म्हणाले.

आणखी वाचा- करोनाच्या नव्या प्रकारानंतर Air India चा निर्णय; ओमान, सौदी अरेबियाची विमानसेवा बंद

सत्तर टक्के जास्त संक्रमणशील व संसर्गजन्य :
यासोबतच, मुखपट्टी लावणे व सामाजिक अंतर पाळणे हेच दोन उपाय त्यावर आहेत, त्यातून या विषाणूचा प्रसार रोखला जाईल असं मूर्ती यांनी सांगितलं. “करोना विषाणूचा हा नवीन प्रकार सत्तर टक्के जास्त संक्रमणशील व संसर्गजन्य आहे. पण लसी त्यावर परिणामकारक ठरत नाहीत असे मानण्याचे कुठलेही कारण नाही. आताच या विषाणूबाबत काही सांगणे शक्य नसले तरी तो वेगाने पसरतो आहे”, असं मूर्ती यांनी सांगितलं. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे, असं आवाहनही त्यांनी केलं.

आणखी वाचा- समजून घ्या : काय आहे करोनाचा नवा प्रकार?

दरम्यान, ब्रिटनमध्ये वेगाने पसरणारा करोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याने खळबळ उडाली असून फ्रान्सने त्या देशासमवेतच्या सीमा बंद केल्या आहेत. जर्मनी, बल्गेरिया, आयरिश प्रजासत्ताक, तुर्कस्तान व कॅनडा यांनी ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. भारताकडूनही विमानांवर बंदी लागू करण्यात आली आहे. सध्या तरी ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या लोकांची कठोर तपासणी सुरू असून आरटी पीसीआर चाचण्या सक्तीच्या आहेत. ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांवर ज्या देशांनी निर्बंध लादले त्यात हाँगकाँग, इस्रायल, इराण, क्रोएशिया, अर्जेटिना, चिली, मोरोक्को व कुवेत यांचा समावेश आहे.