पाकिस्तानच्या हवाई दलांनी भारताचे लढाऊ विमान पाडल्याचा दावा केला जात असतानाच भारताच्या संरक्षण मंत्रालयातील सुत्रांनी तो दावा फेटाळून लावला आहे. पाकिस्तानच्या दाव्यात तथ्य नसल्याचे स्पष्टीकरण संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिले आहे.
पाकिस्तान सैन्याने बुधवारी भारतीय हवाई दलाचे विमान पाडल्याचा दावा केला होता. भारताच्या दोन विमानांनी पाकिस्तानमध्ये घुसखोरी केली आणि या दोन्ही विमानांना आम्ही पाडले. यातील एक विमान पाकव्याप्त काश्मीरच्या हद्दीत आणि दुसरे विमान भारताच्या हद्दीत कोसळले, असे पाकने म्हटले होते. पाकिस्तानचा हा दावा संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी फेटाळला आहे. या दाव्यात तथ्य नसून भारतीय विमानांचे पाकमध्ये नुकसान झालेले नाही, असे स्पष्टीकरण सूत्रांनी दिले आहे.
दरम्यान, बुधवारी सकाळी पाकिस्तान हवाई दलातील तीन विमानांनी भारताच्या हद्दीत घुसखोरी केली होती. यातील एक विमान भारताच्या हवाई दलाने नौशेरा भागात पाडले आहे. भारतीय हवाई दलाच्या या कारवाईमुळे सलग दुसऱ्या दिवशी पाकिस्तानला हादरा बसला आहे.
मंगळवारी पहाटे भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथे सर्जिकल स्ट्राइक केले होते. पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर हा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात हवाई दलाने तब्बल ३५० दहशतवाद्यांना मारल्याचा अंदाज आहे. भारताच्या या कारवाईमुळे पाकिस्तान हादरला असून बुधवारी अमेरिकेनेही पाकिस्तानचे कान टोचले होते. भारतावर लष्करी कारवाई करण्याऐवजी दहशतवादी तळांवर कारवाई करावी, असे अमेरिकेने पाकला सुनावले होते.