किती दहशतवादी एअर स्ट्राईकमध्ये मारले गेले त्याचे पुरावे द्या अशी मागणी काँग्रेसकडून होत असतानाच NTRO च्या सर्व्हिलन्सने असा दावा केला आहे की बालाकोटमध्ये असलेल्या दहशतवादी तळांमध्ये 300 मोबाईल सक्रिय होते. गुप्तचर संस्थने ही माहिती दिल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. 300 फोन अॅक्टिव्ह असल्याने तिथे किती दहशतवादी होते हे आता स्पष्ट झाले आहे असेही NTRO ने म्हटले आहे.

वायुसेनेच्या मिराज 2000 लढाऊ विमानांनी पुलवामा हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर देण्यासाठी एअर स्ट्राईक केला होता. त्यावेळी या बालाकोट भागात असलेल्या दहशतवादी तळांवर 300 मोबाईल अॅक्टिव्ह होते अशी माहिती NTRO ने दिली आहे. एअर स्ट्राईकच्या आधी हा आढावा घेण्यात आला होता. ही माहिती समोर आल्यानंतर 12 मिराज 2000 लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर हल्ला केला आणि पुलवामाचे चोख उत्तर दिले.

अधिकृतरित्या नेमके किती दहशतवादी मारले गेले याची आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही. अशात वायुदलाचे प्रमुख बी. एस. धनोआ यांनी आरोपांवर उत्तर देत आमचे काम दहशतवादी संपवणं आहे ते मोजत बसणं नाही असं म्हटलं आहे. आम्ही आमचा लक्ष्यभेद करतो, मृतदेह मोजत नाही असे उत्तर त्यांनी दिले. आता नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन या सरकारी संस्थेने सर्व्हेचा हवाला देत बालाकोटच्या दहशतवादी तळांवर 300 मोबाईल अॅक्टिव्ह होते असं म्हटलं आहे.

Story img Loader