अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या भारत भेटीच्या अंतिम टप्प्यात ‘सिरी फोर्ट’ येथे केलेल्या भाषणात भारतातील धार्मिक मूलतत्त्ववादावर भाष्य केले होते, मात्र अध्यक्षांचे ते भाष्य म्हणजे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला मारलेला टोमणा नाही, असा खुलासा व्हाइट हाऊसतर्फे करण्यात आला आहे. २७ जानेवारी रोजी ओबामा यांनी केलेले भाषण म्हणजे भारत आणि अमेरिका या दोन्ही राष्ट्रांमधील मुख्य लोकशाही मूल्यांचे साधम्र्य दाखविण्यासाठी केलेली टिप्पणी होती, असे व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

येथील ‘सिरी फोर्ट’ येथील टाऊन हॉलमध्ये ३५ मिनिटे केलेल्या आपल्या भाषणामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा यांनी धार्मिक सहिष्णुतेचा पुरस्कार केला होता. धर्माच्या आधारावर भारतात अजूनही दुफळी माजलेली नाही आणि जोवर हे चित्र असे एकोप्याचे आहे, तोवर भारताचा विजयरथ आगेकूच करीत राहील, असे त्यांनी म्हटले होते. दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी केलेले हे भाषण म्हणजे ‘निरोप घेतेवेळी मारलेला टोमणा’ नाही, कोणत्याच अंगाने हे विचार आपल्याला तसे वाटत नाहीत, असे स्पष्टीकरण व्हाइट हाऊसच्या राष्ट्रीय संरक्षण परिषदेच्या दक्षिण आशियाई विभागाचे वरिष्ठ संचालक फील रेनर यांनी दिले.
‘त्या भाषणातील मुख्य मुद्दा आपण पाहिलात तर आपल्या लक्षात येईल की, अमेरिका आणि भारत ही दोन्ही राष्ट्रे लोकशाहीच्या काही समान मूल्यांचे कसोशीने पालन करतात, अशी तत्त्वे आपापल्या देशाच्या नागरिकांना सहजपणे अंगीकारता यावी, अशी व्यवस्था तयार करतात, असे सुचविणारा ओबामा यांच्या भाषणाचा रोख होता,’ असे रेनर यांनी सांगितले.
पंतप्रधानांचीच री ओढली!
२६ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यक्ष ओबामा यांच्यासह झालेल्या चर्चेत लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांचा मुद्दाच अधोरेखित केला होता. दिल्ली जाहीरनाम्यातील पहिले वाक्यच मुळी ‘मूलभूत स्वातंत्र्याचे’ तत्त्व अधोरेखित करणारे होते हे तुम्ही विसरू नका, अशी आठवण फील रेनर यांनी प्रश्नकर्त्यांना करून दिली आणि २७ जानेवारी रोजी अध्यक्ष ओबामा यांनी याच मुद्दय़ास प्राधान्य दिले, असे त्यांनी सांगितले.