उडिया या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
उडिया ही अतीव प्राचीन भाषा असून या भाषेचे हिंदी, संस्कृत, बंगाली आणि तेलुगू यांपैकी एकाही भाषेशी साधम्र्य नाही. त्यामुळे अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात कोणतीही अडचण आली नाही, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली.मंत्रिमंडळाच्या मान्यतेमुळे आता, संस्कृत, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम् या भाषांच्या यादीत उडियाचा समावेश झाला आहे. आता यामुळे, ‘अभिजात भाषा अभ्यास केंद्रा’ची स्थापना करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अभिजात भाषा दर्जा मिळाल्यामुळे या भाषेच्या विशेष अभ्यासासाठी तसेच या भाषेच्या अभ्यासकांसाठी विद्यापीठामध्ये अध्यासनांची स्थापना करण्याबाबतचा विनंती अर्ज विद्यापीठ अनुदान आयोगाकडे पाठविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
निवडपद्धती आणि वैशिष्टय़
भारताच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे स्थापन करण्यात आलेल्या भाषातज्ज्ञांची समिती एखादी भाषा अभिजात ठरू शकेल का याची छाननी करते. या भाषेतील साहित्याची निर्मिती किमान १५०० ते २००० वर्षांपूर्वीपासून सुरू आहे का तसेच भाषेचे उगमस्थान अन्य कोणत्या भाषेत आहे का याचा अभ्यास करण्यात येतो. आणि या समितीच्या शिफारशीनंतरच, संबंधित भाषेला तो दर्जा बहाल केला जातो. अभिजात भाषेचा दर्जा मिळविणारी उडिया ही आर्य-भारतीय भाषासमूहांतील पहिली भाषा आहे.