पाकिस्तानी लष्कराचं समर्थन असणारे दहशतवादी अमरनाथ यात्रेवर हल्ला करण्याचा कट आखत असल्याची खात्रीलायक माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळालं असल्याचं भारतीय लष्कराकडून सांगण्यात आलं आहे. अमरनाथ यात्रेच्या मार्गावर भुसुरुंग आणि स्नायपर रायफल सापडली असल्याची माहिती यावेळी भारतीय लष्कराने दिली आहे.

“गेल्या तीन ते चार दिवसांपुर्वी गुप्तचर यंत्रणांनी खात्रीलायक माहिती दिली असून पाकिस्तान आणि त्यांच्या लष्कराचं समर्थन असणारे दहशतवादी अमरनाथ यात्रेवर हल्ला करण्याचा कट आखत आहेत. याच माहितीच्या आधारे आम्ही शोधमोहिम सुरु केली होती. यावेळी आम्हाला चांगलं य़श मिळालं” अशी माहिती लष्कराचे वरीष्ठ अधिकारी लेफ्टनंट जनरल केजेएस ढिल्लोन यांनी दिली आहे.

भारतीय लष्कराने घेतलेल्या शोधमोहिमेत एक भुसुरुंग सापडला असून पाकिस्तानातील फॅक्टरीत तयार करण्यात आला आहे. तसंच एम-२४ अमेरिकन स्नायपर रायफल सापडली असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली आहे. जम्मू काश्मीरमध्ये जवानांची संख्या वाढवली असल्याची माहिती असून त्याच पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर आणि पोलिसांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली.

यावेळी बोलताना लेफ्टनंट जनरल केजेएस ढिल्लोन यांनी पाकिस्तानी लष्कराचा थेट संबंध दर्शवणारे भुसुरुंग आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्याचं सांगितलं. तसंच काही बॉम्बही सापडले आहेत. “अद्यापही शोधमोहिम सुरु आहे. शांतता भंग करण्यासाठी पाकिस्तान पुरेपूर प्रयत्न करत आहे. पण आम्ही हे होऊ देणार नाही”, अशी माहिती ढिल्लोन यांनी दिली आहे.

यावेळी काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक स्वयं प्रकश पानी यांनी खोऱ्यात खासकरुन पुलवामा आणि शोपियन येथे १० हून जास्त वेळा भुसुरुंग स्फोट घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याची माहिती दिली. तर ८३ टक्के दहशतवाद्यांचा दगडफेकीचा इतिहास असल्याची माहिती लष्कराने दिली आहे.