भारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना हेरगिरीप्रकरणी पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे. त्याविरुद्ध उपलब्ध असलेले कायदेशीर उपाय त्यांना नाकारून पाकिस्तानने पुन्हा आपला खरा चेहरा उघड केला आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाचेही उल्लंघन केले आहे, असे भारताने गुरुवारी स्पष्ट केले. या प्रकरणी आणखी पर्यायांचा वापर करता येईल का, हे तपासून पाहण्याचे भारताने ठरविले आहे.
जाधव यांना फेरविचार याचिका दाखल करण्यास मदत व्हावी यासाठी पाकिस्तानच्या सूचनेवरून भारताने पाकिस्तानमधील वकिलाची नियुक्ती केली. परंतु त्यासाठी आवश्यक असलेले मुखत्यारपत्र आणि या प्रकरणातील संबंधित दस्तऐवज नसल्याने याचिका दाखल करता येऊ शकली नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितले.
या प्रकरणी परिणामकारक तोडगा काढण्यासाठी भारताकडे उपलब्ध असलेले सर्व मार्ग पाकिस्तानने रोखले आहेत, जाधव यांना राजनैतिक अधिकाऱ्यांची भेट घेऊ द्यावी अशी विनंती भारताने एक वर्षांत १२ वेळा केली आहे. सातत्याने विनंती करूनही या प्रकरणाशी संबंधित असलेला दस्तऐवज उपलब्ध करून न देणे, राजनैतिक अधिकाऱ्यांची कोणत्याही अडथळ्याविना भेट घालून न देणे यावरून पाकिस्तानने पुन्हा एकदा आपला हास्यास्पद दृष्टिकोन उघड केला आहे, असेही श्रीवास्तव म्हणाले.