पाकिस्तानमधील इम्रान खान सरकारच्या समोरील अडचणी संपता संपत नाही आहेत. गेल्या आठवड्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होताच पाकिस्तानमधील विरोधकांनी इम्रान खान यांना घेराव घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर विरोधकांनी सभागृहात ‘डॉन्की राजा की सरकार नही चलेगी’ अशी घोषणा देण्यास सुरुवात केली.

पाकिस्तानमधील अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षाच्या नेत्यांनी ‘डॉन्की राजा की सरकार नहीं चलेगी'(गाढव राजाचे सरकार नाही चालणार) अशी घोषणाबाजी केली. या दरम्यान काही खासदारांनी सरकारला विरोध करण्यासाठी त्यांच्या हातात पोस्टर घेतले होते. पाकिस्तानमध्ये गाढवांची संख्या वाढत आहे, परंतु इम्रान यांच्या कारकिर्दीत अर्थव्यवस्था बुडत आहे, महागाईने आकाशाला स्पर्श केला आहे असा मजकूर त्या पोस्टवर लिहिलेला होता.

शुक्रवारी २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये राबवण्यात येणाऱ्या योजना पाकिस्तानी संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान मांडण्यात आल्या होत्या. परंतु यावेळीही विरोधकांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. त्याचबरोबर इम्रान खान यांचे सरकार स्थापन झाल्यापासून पाकिस्तानमध्ये गाढवांची संख्या वाढत असल्याचे विरोधकांनी म्हटले.

पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात विरोधकांची घोषणाबाजी

२०२०-२१ या आर्थिक वर्षात पाकिस्तानमध्ये गाढवांची संख्या वाढून ५६ लाख झाली आहे. गाढवांच्या वाढत्या संख्येला सामोरे जाण्यासाठी पाकिस्तान त्यांची चीनमध्ये निर्यात करणार आहे असे बोलले जात आहे. चीन त्यांना जास्त किंमतीत खरेदी करतो.

पाकिस्तानमध्ये गाढवाच्या संख्येमध्ये मोठी वाढ

२०२१ मध्ये गाढवाची सर्वाधिक संख्या असणारा पाकिस्तान हा जगातील तिसरा अव्वल क्रमांकाचा देश ठरला आहे, असे जिओ टीव्हीने म्हटले आहे. आर्थिक सर्वेक्षण २०२१ च्या आकडेवारीनुसार देशात दरवर्षी १०,००० गाढवांची वाढ होत आहे. म्हशींच्या संख्येमध्येही १.२ दशलक्ष वाढ झाली आहे, तर मेंढ्यांची संख्या ३१.२ दशलक्षांवरून ३१.५ दशलक्षांवर गेली आहे, वर्षाकाठी तब्बल ४००,००० इतकी ही संख्या वाढत आहे.  पाकिस्तानमध्ये जनावरे व गाढवे यांच्या संख्येत झालेली वाढ पंजाब पशुधन विभागाने प्रथम उघडकीस आणली होती.

सरकार पडण्याच्या भीतीने अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी मोठी तरतूद

त्यामुळे पाकिस्तानात सध्या सरकारविरुद्ध जनेतमध्ये रोष निर्माण झाला आहे. सैन्य आणि विरोधी पक्ष मिळून आपली सत्ता खाली आणतील असे वक्तव्य इम्रान खान यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यामुळे सरकार पडेल अशी भीती आता इम्रान खान यांना वाटू लागली आहे. सैन्याच्या भीतीने त्यांनी संरक्षण बजेटमध्ये मोठी वाढ केली आहे.

इम्रान खान यांच्या सरकारने शुक्रवारी पाकिस्तानच्या पुढील आर्थिक वर्षासाठी ८,४८७ अब्ज रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. यामध्ये संरक्षण क्षेत्रासाठी १,३७० कोटींचा निधी मंजूर केला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यामध्ये ६.२ टक्के वाढ झाली आहे. मागील वर्षासाठी करण्यात आलेल्या तरतूदीवरुन पाकिस्तानी सैन्य नाराज असल्याची माहिती होती. तर दुसरीकडे इम्रान खान देश सांभाळू शकले नाहीत असा आरोप करण्यात येत आहे. गाढवांप्रमाणे देशाकडे तितकेसे लक्ष दिले असते तर अशी परिस्थिती उद्भवली नसती असे विरोधकांचे म्हणणे आहे.