शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये अनेकदा वर्गात गोंधळ सुरु असताना शिक्षक, ‘अरे वर्ग आहे की मासळी बाजार,’ अशा शब्दांमध्ये संताप व्यक्त करताना दिसतात. मात्र सध्या पाकिस्तानी जनतेलाही असाच काहीचा प्रश्न त्यांच्या संसदेमध्ये घडलेल्या प्रकारानंतर पडलाय. ‘राष्ट्रीय संसद आहे की मासळी बाजार.’ अशा प्रश्न विचारावा लागेल एवढा गोंधळ मंगळवारी पाकिस्तानी संसदेमध्ये पहायला मिळाला. फाईल्सने हल्ला, शिव्या, आरडाओरड अन् एकमेकांवर धावून जाण्याचा प्रयत्न असा सारा संसदेमधील गोंधळ देशातील जनतेने वृत्तवाहिन्यांवर लाईव्ह पाहिला.

पाकिस्तानमधील कनिष्ट सभागृह म्हणजेच नॅशनल असेंबलीमध्ये प्रचंड गोंधळ झाल्याचे व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहेत. कनिष्ट सभागृहामध्ये सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी एकमेकांचा मान सन्मान न करता थेट शिव्या देण्यास सुरुवात केली. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार संसदेच्या कनिष्ट सभागृहात पंतप्रधान इम्रान खान यांच्या पीटीआय आणि विरोधी पक्षातील खासदारांनी एकमेकांना फाईल्स फेकून मारल्या. केवळ एकमेकांना शिव्या देऊन आणि आरडाओरड करुन समाधान झालं नाही म्हणून हे खासदार एकमेकांना मारण्याचाही प्रयत्न करत होते. पाकिस्तानी खासदारांनी एकमेकांना आया-बहिणींवरुन शिव्या दिल्याचंही प्रसारमाध्यमांनी म्हटलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे महिला खासादारांसमोरच हा शिवीगाळ सुरु होता. पाकिस्तानी संसदेमध्ये महिला लोकप्रितिनिधींसमोरच खासदार एकमेकांबद्दल अपशब्दाचा वापर करताना दिसून आले. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर सुरक्षारक्षकांना पाचारण करण्यात आलं.

नक्की वाचा >> Coronavirus: भारताच्या मदतीसाठी पाकिस्तानी संस्थांनी गोळा केले कोट्यावधी रुपये दहशतवादी कारवायांसाठी वापरले जाण्याची भीती

नक्की काय घडलं?

पाकिस्तानमधील द डॉन या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार संसदेच्या कनिष्ट सभागृहामध्ये अर्थसंकल्पावरुन वाद झाला. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे धाकटे बंदू शहबाज शरीफ हे सभागृहाला संबोधित करत होते. मागील आठवड्यामध्ये इम्रान खान सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पासंदर्भात शहबाज शरीफ बोलत होते. मात्र त्याचवेळी सत्ताधारी इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाचे खासदार अली अवान आणि एका विरोधी पक्षाच्या खासदाराने आरडाओरड सुरु केला. ते एकमेकांना शिव्या देऊ लागले. शिव्या देतानाच अली अवान यांनी त्यांच्या हातातील पुस्तक विरोधी पक्षातील खासदाराकडे भिरकावले. त्यानंतर पाहता पाहता सर्वच खासदार एकमेकांकडे वस्तूंचा मारा करु लागले आणि संसदेला जणू युद्धभूमीचे स्वरुप आले. सोशल नेटवर्किंगवर या गोंधळाचे अनेक व्हिडीओ व्हायरल झालेत.

नक्की वाचा >> कुलभूषण जाधव यांना फाशीविरोधात मागता येणार दाद; पाकिस्तानातील सुधारित कायद्याचा लाभ

इम्रान यांच्यावर साधला निशाणा

पीएमएल-एनच्या खासदार मरियम औरंगजेब यांनी इम्रान खान यांच्यावर पंतप्रधानांनी संसदीय व्यवस्थेला कमकुवत केल्याचा आरोप केला. इम्रान खान यांचा हाच नवा पाकिस्तान आहे जिथे फॅसिस्ट शक्तींचं वर्चवस्व आहे. इम्रान यांच्यामध्येही फॅसिस्ट मानसिकता दिसून येते. इम्रान यांनी देशाच्या संसदेला लाचार बनवलं आहे. त्यांनी पाकिस्तानमधील लोकशाहीची कंबर मोडलीय. हीच इम्रान यांची रियासत-ए-मदीना आहे, अशा शब्दांमध्ये मरियम यांनी पंतप्रधानांवर टीका केली.

नक्की वाचा >> ‘तुमच्याकडील करोना परिस्थिती गंभीर, आम्ही रुग्णवाहिका पाठवतो तुम्ही फक्त…’; पाकिस्तानमधून मोदींना पत्र

टीव्हीवर लाइव टेलीकास्ट

पाकिस्तानी संसदेमध्ये सुरु असणारा हा गोंधळ संपूर्ण देशाने टीव्हीवरुन लाईव्ह पाहीला. देशातील जनतेने निवडून दिलेले खासदार एकमेकांशी कुत्र्या मांजरीसारखे भांडतानाचं चित्र पहायला मिळालं. पाकिस्तानी खासदार एकमेकांवर अर्थसंकल्पाच्या प्रती फेकून मारत होते. समोर टेबलावर दिसेल ती गोष्ट विरोधी पक्षाच्या खासदाराच्या दिशेने भिरकावली जात होती. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर स्पीकरने असेंबलीच्या सुरक्षारक्षकांना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी बोलवलं. मात्र सुरक्षारक्षकही या गोंधळासमोर अपुरे पडल्याचं चित्र दिसलं. त्यानंतर वरिष्ठ सभागृहाच्या सुरक्षारक्षकांना बोलवण्यात आलं. त्यानंतरही खासदार एकमेकांना शिव्या देत, फाइल्स एकमेकांच्या अंगावर फेकत होते. अनेक पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांवर याचं लाईव्ह टेलिकास्ट झालं.

या साऱ्या गोंधळानंतर नवाज शरीफ यांच्या भावाने ट्विटरवरुन इम्रान खान सरकार आणि त्यांच्या पक्षाच्या खासदारांवर संसदेमध्ये गुंडगीरी करण्याचा आरोप केला.