पाकिस्तानी लष्कराचे तालिबानशी असणाऱ्या संबंधांवर पाकिस्तानमधील सत्ताधारी पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) या पक्षाच्या नेत्याने लाइव्ह शोदरम्यान भाष्य केलं आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वामध्ये सत्तेत असणाऱ्या तहरीक-ए-इन्साफच्या नेत्याने पाकिस्तानची भारतविरोधी भूमिका स्पष्ट करताना काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तान आता तालिबानची मदत घेणार असल्याचं या नेत्याने म्हटलं आहे.

पीटीआयच्या माहिला नेत्या नीलम इरशाद शेख यांनी टीव्हीवरील लाइव्ह चर्चेदरम्यान तालिबानने काश्मीरमध्ये पाकिस्तानला मदत करण्याची घोषणा केल्याचं वक्तव्य केलं. “तालिबानने आम्ही तुमच्या सोबत आहोत असं आम्हाला सांगितलं असून ते काश्मीरमध्ये आम्हाला मदत करणार आहेत,” असं शेख म्हणाल्या आहेत. मात्र यापूर्वीच तालिबानने काश्मीर हा भारताचा अंतर्गत प्रश्न असून तो दोन देशांमधील विषय असल्याचं सांगत आपली भूमिका आधीच स्पष्ट केलीय. नीलम शेख यांचं वक्तव्य ऐकून कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करणाऱ्या अँकरने, “तुम्ही काय बोलत आहात तुम्हाला समजतंय का? तुम्ही काय बोलताय हे तुम्हाला कळत नसावं. हे कार्यक्रम जगभरामध्ये पाहिला जाणार आहे. भारतातही हा पाहिला जाणार आहे,” असं म्हटलं.

मात्र या अँकरच्या वक्तव्याकडे लक्ष न देता या माहिला नेत्याने पुन्हा एकदा, “तालिबान आपल्याला मदत करेल कारण त्यांना चुकीच्या पद्धतीने वागणूक देण्यात आलीय,” असं मत व्यक्त केलं. यापूर्वीही अफगाणिस्तान सरकारने पाकिस्तान लष्कर आणि गुप्तचर यंत्रणांनी तालिबानला मदत केल्याचे आरोप केले आहेत.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी यापूर्वीच अफगाणिस्तानमधील तालिबानी सत्तेचं स्वागत केलं आहे. “गुलामगिरीच्या जोखडातून तालिबानची सुटका झाली. जेव्हा आपण दुसऱ्यांची संस्कृती आत्मसात करतो तेव्हा आपण मानसिकरित्या गुलाम होतो. सांस्कृतिक गुलामगिरीतून बाहेर येणं सोपं नसतं. अफगाणिस्तानात आता जे काही होत आहे. ते गुलामगिरीच्या साखळ्या तोडण्यासारखं आहे.”, असं विधान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी तालिबानने काबूलवर ताबा मिळवल्यावर केलं होतं.

अफगाणिस्तानात तालिबानचं राज्य प्रस्थापित झाल्याने अमेरिका, ब्रिटेन, उत्तर कोरिया, ऑस्ट्रेलियासहित अनेक देशांनी आपली दूतावास बंद केले आहेत. हे देश अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना मायदेशी नेण्यासाठी सध्या प्रयत्न करत आहेत. अमेरिकेने ९/११ हल्ल्यासाठी अल कायदाला जबाबदार धरलं होतं. यासाठी अमेरिकेने २००१ मध्ये अफगाणिस्तानवर हल्ला केला होता. अफगाणिस्तानवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेनं तालिबानला बाहेर केलं. त्यानंतर देशाच्या सुरक्षेसाठी अफगान सुरक्षा दल आणि पोलिसांना प्रशिक्षण दिलं. अमेरिकेने गेल्या २० वर्षातील युद्धात २० खरब डॉलर खर्च केले आणि २,३१२ सैनिक शहीद झाले आहेत.