काश्मीर प्रश्नाला पंडित नेहरूच कारणीभूत आहेत असा आरोप भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केला. सरदार वल्लभभाई पटेल हे जर देशाचे पंतप्रधान झाले असते तर काश्मीरचा मुद्दा निर्माण झालाच नसता असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे. काश्मीरच्या पुलवामा मध्ये जेव्हा हल्ला झाला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी शुटिंगमध्ये व्यग्र होते असा आरोप काँग्रेसने केला. ज्याला उत्तर देताना अमित शाह यांनी थेट नेहरूंवरच निशाणा साधला आहे. तसेच काँग्रेसच्या टीकेमध्ये काहीही तथ्य नसल्याचे म्हटले आहे. हल्ला झाला त्यादिवशी पंतप्रधान कुठे होते यावरून विरोधक राजकारण करत आहेत त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे.

काश्मीर प्रश्नाचे जनक कोण असा प्रश्न विचारला गेला तर त्याचे उत्तर पंडित नेहरू असेच आहे. नेहरूंमुळे काश्मीरचा मुद्दा निर्माण झाला. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. काश्मीर खोरे कायम धगधगतेच असते या सगळ्याचं कारण पंडित नेहरू आहेत त्यांनी हा प्रश्न निर्माण केला आणि भिजत ठेवला असाही आरोप अमित शाह यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या देशाचे असे पंतप्रधान आहेत जे २४ पैकी १८ तास काम करतात. देशाच्या सुरक्षेसाठी ते कटिबद्ध आहेत त्यांच्यावर तुमच्यासारख्यांच्या आरोपांमुळे परिणाम होणार नाही असेही अमित शाह यांनी ठणकावले आहे.

पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. हा हल्ला जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने केला. ज्या दिवशी हा हल्ला झाला म्हणजेच १४ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी शुटिंग करण्यात व्यग्र होते असा आरोप काँग्रेसने केला आहे. याच आरोपांना अमित शाह यांनी उत्तर दिले आहे. या गोष्टीचा अकारण मुद्दा तयार करण्यात आला आहे. तुम्हाला जे आरोप करायचे आहेत ते खुशाल करा त्याने पंतप्रधानांना काहीही फरक पडणार नाही असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे.

Story img Loader